नवी मुंबई : नवी मुंबई लगत असणाऱ्या तुर्भे एमआयडीसी येथील एका कंपनीत जनित्रातून निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड मुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यामुळे सुमारे १५ जणांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
तुर्भे एमआयडीसी येथे स्वास्थ्य आरोग्य एन्टरप्राइजेस नावाची कंपनी असून या ठिकाणी फळांचे पॅकिंग केले जाते. आज दुपारी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जनित्र (जनरेटर ) लावण्यात आले होते. मात्र ज्या ठिकाणी महिला पुरुष काम करत होते. त्या खोलीत जनित्रातून निघणारा धूर जात होता. काही वेळ दुर्लक्ष केले गेले. मात्र हळू हळू अनेकांना धुराचा अति त्रास सुरु होऊन श्वास घेता घेता येत नव्हता. हे लक्षात आल्यावर जनित्र बंद करण्यात आले. मात्र तरीही त्रास होत असल्याने सुमारे १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तुर्भे एमआयडीसी पोलीस दाखल झाले. घटनेत जीवित हानी झाली नाही. घटनेची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
भूखंड क्रमांक डी ३२६ या ठिकाणी एका पुढील बाजूस ऑक्सिजन सिलेंडरचे काम चालते तर मागील बाजूस फळांचे पॅकिंग काम चालते. जनरेटरचे धुरांडे चुकीच्या पद्धतीने असल्याने धूर खोलीत गेला व अनेकांना त्रास सुरु झाला. अशा मानवी चुकांच्या घटना होऊ नये म्हणून संबंधित व्यवस्थापनाने काळजी घेणे आवश्यक आहे. अशी माहिती शिवसेना (उबाठा ) उपशहर प्रमुख महेश कोटीवाला यांनी दिली.