नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथे मद्य प्राशन केल्यावर दोन गटात वाद झाले या वादात तीन जणांनी एकाला बेदम मारहाण केली यात बिअरची बाटली एकाच्या डोक्यात फोडल्याने त्याचा अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे तर मुख्य संशयित आरोपीचा शोध सुरु आहे.

सोमवारी रात्री शीव पनवेल मार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुलाखाली एक पंडित आर्य नावाचा ३० वर्षीय व्यक्ती उघड्यावर मद्य प्राशन करत बसला होता. काही वेळाने आर्यन ,विकी बुधनेर , आणि राजकुमार हे तीन युवक मद्य प्राशन करण्यास याच उड्डाणपुलाखाली आले. पंडित ज्या ठिकाणी बसले त्यापासून काही अंतरावर हे तिघे मद्य प्राशन करण्यास बसले होते.

मद्याचा अंमल झाल्यावर मोठ्यांदा बोलण्यावरून पंडित आणि अन्य तिघांचे वाद झाले. त्यात पंडित हा तिघांच्या अंगावर धावून गेल्यावर तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. यावेळी उड्डाणपुलाखाली पडलेल्या भंगारातून फायबर पाईप, बांबू याने पंडित याला मारहाण करत असताना विकी बुधनेर याने पंडित याच्या डोक्याच्या मागील बाजूवर बिअरची बाटली जोरात मारून फोडली. त्या वेळी पंडित खाली कोसळला आणि तिघेही पळून गेले. याबाबत तुर्भे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी घाव घेतली. पंडित याला रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पोलीस घटनस्थळाच्या आसपास संशयित आरोपींचा शोध घेत होते. त्याच वेळी घटनस्थपासून काही अंतरावर राजकुमार आणि आणि आर्यन पोलिसांच्या हाती लागले. मात्र मुख्य आरोपी विकी बुधनेर या पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.

चौकट: यातील आरोपी आणि मयत व्यक्ती हे सर्व बिगारी कामगार असून तुर्भे उड्पुलाखालीच रात्री झोपतात. दिवसभर मिळेल ते काम करून जे काही पैसे मिळतील त्यात मद्य प्राशन करून आहे ते खाऊन येथेच झोपतात. सकाळ झाली कि सार्वजनिक स्वच्छतागृहांत ऐहिक उरकून पुन्हा कामाच्या शोधार्थ फिरणे सुरु करतात. असा दिनक्रम असल्याने रात्रीच्या मद्य प्राशन केल्यावर वेळी रोज आरडाओरडा वाद भांडणे हे नित्याचेच झालेले आहे. पोलिसांनीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून गोंधळ घालणे मद्य प्राशन केल्या प्रकरणी कारवाई करतात. मात्र असले प्रकार अद्याप सुरु आहेत.