नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कमध्ये थेट प्रवास करता यावा यासाठी सिडकोने तुर्भे ते खारघर या सहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार केला असून राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडकोने या कामाची निविदा काढण्याच्या दृष्टीने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून या पावसाळय़ानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने व्यक्त केली.
राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी शीव-पनवेल या २३ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे रुंदीकरण व सिमेंट क्राँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे या मार्गावर सुसाट प्रवास शक्य झाला असून दिवसाला दोन लाखांपेक्षा जास्त वाहने या मार्गावरून प्रवास करीत आहेत. भरघाव प्रवासामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. यात दुचाकी वाहनचालकांचा बळी जाण्याची घटना जास्त घडत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अंर्तगत वाहतूक या मार्गावरून प्रवास करीत असल्याने हे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी सष्ट केले आहे.
शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात वळविण्यात यावी म्हणून रस्ते विकास महामंडळाने तुर्भे औद्योगिक वसाहत ते खारघर हा सहा किलोमीटर लांबीचा पारसिक डोंगर पोखरून तयार करण्यात येणारा भुयारी मार्गाचा प्रस्ताव सुचविला आहे. सध्या अशा प्रकारे ऐरोली ते कटई नाका या १२ किलोमीटर लांबीचे भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी एक हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला जात असून या मार्गावरील पहिली मार्गिका या वर्षअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. ऐरोली येथील जमीन संपादन करून हा आडमार्ग काढण्यात आला आहे. यामुळे शिळफाटा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे.
सहा किलोमीटर लांबीचा मार्ग
या भुयारी मार्गाप्रमाणेच हा भुयारी मार्ग थेट खारघर येथील ८० हेक्टर जागेवर निर्माण करण्यात येणाऱ्या बीकेसी धर्तीवरील केबीसी आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कला जोडण्यात येणार आहे. सहा किलोमीटर लांबीच्या या पारसिक डोंगराची रांग पोखरून तयार करण्यात येणाऱ्या भुयारी मार्गावर ४५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असून सिडकोने या कामासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे यंदा पावसाळय़ानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे.
गणेश नाईक यांची अधिवेशनात मागणी
नवी मुंबईत केंद्रीय पातळीवरील मोठे प्रकल्प येणार असल्याने महामुंबईतील दळणवळणाची साधने वाढविण्याची आवश्यकता असून यात कांजूरमार्ग कोपरखैरणे चौथा खाडी पूल व तुर्भे खारघर भुयारी मार्गाची गरज असल्याचे प्रतिपादन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केले होते. हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार
Due to the spread of concreting material on the highway traffic is still obstructed
महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या साहित्याचा पसारा; वाहतुकीला अडथळे कायम