मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या तसेच औद्योगिकदृष्टय़ा विस्तारणाऱ्या उरणच्या एसटी महामंडळातील प्रवाशांची संख्या वाढत असून मार्गातही वाढ झाली आहे. असे असले तरी या आगाराला दरवर्षी अडीच कोटींपेक्षा अधिक रकमेच्या तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आगाराकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांमुळे यंदा या तोटय़ात काहीशी घट झाली आहे.
उरण एसटी आगारातून दिवसाला ७८ गाडय़ा सुटतात, या गाडय़ांच्या रोज ५५६ फेऱ्या होतात. यातून २८ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. या आगाराचे पनवेल, दादर, पेण, ठाणे व कळंबोली हे पाच प्रमुख मार्ग आहेत. काही वर्षे मुंबई विभागात मोडणारे उरणचे हे आगार नफ्यात चालणारे होते. मात्र २०१३-१४ या आर्थिक वर्षांत आगाराला ३ कोटी ७२ लाखांचा तोटा झाला. तो कमी करून ऑगस्ट २०१५ पर्यंत २ कोटी ५८ लाखांवर आणण्यात यश आले. तोटा कमी करण्याच्या उपाययोजनांमुळे तोटा कमी केला असल्याची माहिती उरण आगाराचे प्रमुख डी. एस. कुलकर्णी यांनी दिली. तोटा कमी करण्यासाठी मुंबई विभागातील प्रवाशांच्या संख्येत वाढ करणे, बस नियमाने चालवून इंधनाची बचत करणे आदी उपाययोजना राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. उरण परिसरात प्रवाशांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या संदर्भातील अहवाल सादर करूनही कारवाई होत नसल्याने प्रवाशांसाठी स्वस्त व सुखकर प्रवास घडविणाऱ्या एसटीवर तोटय़ाचे संकट ओढवले आहे.