पनवेल : पनवेल महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या निवडणूक आरक्षणाच्या सोडतीनंतर भाजपचे दोनही नेत्यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने प्रभाग क्रमांक १८ आणि १९ मध्ये त्यांच्याऐवजी कोणाला उमेदवारीची संधी मिळणार याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. शेकापमधून भाजपमध्ये पक्षांतर करून उरण विधानसभा निवडणूक लढविलेले प्रितम म्हात्रे आणि भाजपचे महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर या दोघांनी ही निवडणूक न लढण्याच्या निर्णयाच्या वृत्ताला ‘लोकसत्ता’शी बोलताना दुजोरा दिला आहे.

प्रितम म्हात्रे यांनी २०१७ साली प्रभाग क्रमांक १८ मधील जागा शेकापच्या चिन्हावर लढवून ५,७०६ मते मिळवून सध्या भाजप सरचिटणीस नितीन पाटील यांचा ९४८ मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीतील पालिकेच्या विरोधी बाकांवरील सदस्यांचे नेतृत्व करण्याची संधी म्हात्रे यांना मिळाली. दोन ते अडीच वर्षांनी शेकापच्या इतर सदस्यांनी म्हात्रे यांच्या नेतृत्वाविरोधात छुपी बांधणी केली. मात्र शेकापच्या पक्ष नेतृत्वाने त्याकडे काणाडोळा केल्याने पक्षात मोठी पडझड झाली. म्हात्रे यांच्यावरील विश्वासामुळेच शेकापने उरण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या महेश बालदी यांच्याविरोधात उमेदवारी दिल्यानंतर या निवडणुकीत महेश बालदी यांना ९५,२९९ मते मिळाली तर म्हात्रे यांचा ६,५१२ मतांनी पराजयाचा सामना करावा लागला.

म्हात्रे म्हणजे शेकाप असे समीकरण समजले जात असताना उरण मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी गेलेल्या उमेदवारानेच शेकापला रामराम ठोकला. सध्या प्रितम म्हात्रे यांनी उरण मतदारसंघातील ८८,८७८ मतदारांचा पाठिंबा लक्षात घेता यापुढे उरण नगरपरिषद आणि विधानसभा मतदारसंघाकडेच जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. पनवेल महापालिकेतील हक्काची उमेदवारी त्यांच्या निकवटर्तीयांना देण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते किंवा ती निकटवर्तीय व्यक्ती कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

पनवेल महापालिकेच्या निवडणूकीत उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याची अशीच स्थिती भाजपचे परेश ठाकूर यांची आहे. व्यावसायिक कारणास्तव ही निवडणूक लढविणार नसल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले. २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधून ठाकूर यांनी सर्वाधिक म्हणजे ११,२९९ मते मिळवत ७,८४४ मतांनी विजय मिळवला होता.

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेच्या पहिल्या सभागृहातील सदस्यांचे नेतृत्व केले. मात्र यंदा त्यांच्या गैरहजेरीमुळे त्या प्रभागातील मतदारांमध्ये आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. परंतु भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये ठाकूर यांची जागा मिळविण्यासाठी ठाकूर कुटुबियांशी असलेली एकनिष्ठता दाखविण्याचे प्रयत्न सुरू झालेत. ठाकूर व म्हात्रे या दोघांचे प्रभाग मूळ पनवेल शहरात असल्याने या दोन्ही प्रभागातील मतदार त्यांच्या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. ठाकूर व म्हात्रे हे उमेदवार असल्याने या प्रभागात विशेष लक्ष दिले जात होते.

दरम्यान, पनवेल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक ६,७८,९८१ मतदार असलेला असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून नव्याने तयार होणाऱ्या मतदारसंघात परेश ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय चर्चा सध्या पनवेलमध्ये रंगली आहे.