उरणच्या माणकेश्वर व नौदलाच्या परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर खडकाळ भागात मंगळवारी दोन मालवाहू जहाजे अडकली असून या दोन्ही जहाजांवरील खलाशी सुखरूप असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे.

पेण येथील इस्पात कंपनीकडे निघालेले बार्ज वेगावान वाऱ्यामुळे उरणच्या माणकेश्वर व नौदलाच्या परिसरातील समुद्रकिनारी असलेल्या खडकामध्ये अडकली आहेत. यातील एका जहाजाचे नाव एम. व्ही. श्रीकांत आहे.

मंगळवार सायंकाळपासून समुद्रकिनाऱ्यापासून शंभर मीटर अंतरावर हे बार्ज अडकले असल्याची प्राथमिक माहिती असून बार्जवर ४ ते ५ खलाशी असल्याचा अंदाज आहे. या दोन्ही जहाजांशी आपला संपर्क झाला असून या जहाजांवरील खलाशी सुखरूप असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. तसेच ही जहाजे गुरुवारपर्यंत पुन्हा समुद्रात जातील, असे मत व्यक्त केले आहे.