दोन रसायनांच्या मिश्रणाने ‘शीव-पनवेल’ची दुरुस्ती

शीव-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केरळातील एका कंपनीच्या नव्या तंत्राचा उपयोग सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केला आहे. खड्डे स्वच्छ करून त्यात ‘पॉलिमर’ आणि ‘इलास्टोमर’ यांचे मिश्रण असलेले तयार रसायन टाकले जात आहे. या रसायनाचे दोन ते तीन थर लावल्यानंतर पुन्हा खड्डे पडणार नाहीत, असा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा दावा आहे. केरळातील वज्र केमिकल कंपनीचे हे तंत्रज्ञान आहे.

शीव-पनवेल महामार्गाच्या मानखुर्द ते कळंबोलीपर्यंतच्या टप्प्याचे चार वर्षांपूर्वी क्राँक्रीटीकरण करण्यात आले होते, मात्र आता तो खड्डय़ांनी खिळखिळा झाला आहे. हलक्या वाहनांसाठी टोल बंद झाल्याने या मार्गाच्या ठेकेदाराने मध्यंतरी रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले होते. काही दिवसांपूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात जीवितहानी झाली आणि या मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या ‘सायन पनवेल टोलवेज कंपनी’च्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या मार्गावरील वाशी, सानपाडा, तुर्भे, शिरवणे, नेरुळ, सीबीडी येथील उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. संततधार पावसात तर ही कोंडी जास्त त्रासदायक ठरत आहे.

पावसाने काही दिवस उघडीप घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची डागडुजी हाती घेतली आहे. एका नवीन तंत्राने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. केरळमधील व्रज केमिकल कंपनीने हे रसायन तयार केले असून ते पॉलिमर आणि इलास्टोमरचे मिश्रण आहे. हे रसायन घट्ट झाल्यानंतर त्याला वेगळे करणे कठीण असल्याने खड्डय़ांत भरलेले रसायन बाहेर पडणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याने सांगितले.

उड्डाणपुलांसाठी फायदेशीर

या मार्गावर डांबरीकरण झालेल्या जागी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलांवर क्राँक्रीटीकरण करणे शक्य नसल्याने हे डांबरीकरण विशेषत: उड्डाणपुलांवर करण्यात आले आहे. परिणामी खड्डय़ांचे प्रमाण पुलांवर अधिक आहे. पुलांवरील खड्डे बुजवण्यासाठी हे नवे तंत्र अधिक उपयुक्त ठरत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या मंजुषा दंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.