यंदा अपुरा पाऊस व पाण्याचा अपुरा साठा यांमुळे सद्यस्थितीत पाण्याचा व्यवस्थित वापर होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रत्येक आठवडय़ातील गुरुवारी रात्री १२ वाजता ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भागातील मूळ गावठाणे, झोपडपट्टी, दिघा विभाग, ऐरोली गाव, ऐरोली नोडमधील काही भाग, राबाडा गोठिवली, घणसोली गाव, नोसिल नाका व तुभ्रे स्टोअर आदी भागातील थेट नळजोडणीद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहील. तसेच सदर भागात पुढील दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. सदर कालावधीमध्ये या भागामध्ये टँकरद्वारे तसेच मोरबे धरणातून काही भागात उपलब्धतेनुसार काही प्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था कण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शुक्रवारी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र मुख्य जलवाहिनीवरील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत असा एकूण २४ तास बंद राहणार आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुभ्रे, सानपाडा, कोपरखरणे, घणसोली व ऐरोली या विभागात शुक्रवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सिडको नोडमधील कामोठे परिसरातील पाणीपुरवठादेखील बंद राहणार आहे. तरी या काळात पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.