नवी मुंबई : दोन मित्र मैत्रिण बाईकवरून फिरत असताना कारवाले सावज हेरून त्यांच्या गाडीला डॅश मारत होते. हे घडताच गाडी थांबवत त्या गाडीचालकाशी भांडण करीत त्याचे लक्ष विचलित करत त्याच्याकडील चीज वस्तू चोरून पळून जात होते. अशा बंटी बबलीला एपीएमसी पोलिसांनी त्वरित कारवाई करीत अटक केली आहे. त्या दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे.
सुरज पाटील आणि अर्चना पवार, असे अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही २१ वर्षीय असून रबाळे येथे राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांनी दुचाकीवर असताना बोनकोडे सिग्नलनजीक एका कारला डॅश मारली. गाडी चालकाने गाडी थांबवून जाब विचारला असता दोघांनी भांडण उकरून काढत त्याचा मोबाईल हळूच घेऊन पळ काढला. ही बाब लक्षात आल्यावर गाडी चालकाने थेट एपीएमसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे, पोलीस हवालदार संदेश म्हात्रे, शशी नलावडे, चंद्रकांत कदम, उल्हास काळे आणि प्रदीप हरड हे पथक परिसरात आरोपींच्या शोधार्थ पाठवले. त्यावेळी फिर्यादीच्या आरोपी आणि त्यांच्या दुचाकीच्या वर्णनाशी साम्य असलेले जोडपे हे पथक शोधत असताना एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतच ग्रीनपार्क या इमारतीखाली हे दोघे संशयित पोलिसांना आढळून आले.
हेही वाचा – गृहिणींना दिलासा; लसूण झाले स्वस्त, घाऊक बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांची घसरण
पथकाने तात्काळ त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले असता फिर्यादी यांनी त्यांना ओळखले, पोलिसांनी त्यांच्या भाषेत आरोपींशी चौकशी केली असता त्यांनीही गुन्हा कबुल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.