पनवेल – कामोठे, कळंबोली आणि तळोजा परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच उलवे येथील एका महिलेने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीज लपंडावामुळे झोप मिळत नसल्याची व्यथा या महिलेने व्यक्त केली असून, वाढत्या उकाड्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
नवी मुंबई परिसरात उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढली असली तरी महावितरणच्या पायाभूत सुविधांतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अनेक भागांतील जुन्या वीजवाहिन्या, रात्रीच्या वेळी दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता तसेच आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध न होणे यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यास विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
कामोठे परिसरात नुकत्याच झालेल्या बिघाडानंतर नवीन रोहित्र बसविण्यासाठी जवळपास एक दिवस लागल्याने सुमारे २७ तास १५ हजारांहून अधिक रहिवासी अंधारात होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला. सोसायट्यांमधील पाण्याच्या मोटारी बंद पडल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला. या विज गुल झाल्याचा सर्वात मोठा फटका रूग्ण, बालक व जेष्ठांना सहन करावा लागला.
उलवा उपनगरातील सेक्टर ८ मध्ये राहणा-या महिलेच्या व्हिडीओमध्ये सततच्या वीजखंडितीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. सकाळच्या पाळीला घर सोडावे लागत असल्याने रात्री विज गायब असल्याने झोप पुर्ण होऊ न शकत असल्याने या महिलेने तीची व्यथा मांडली. सेक्टर ८ या परिसरात गुरूवार, शुक्रवारी मोठ्याप्रमाणात विज गुल झाली होती. महावितरण कंपनीने या परिसरातील डीपीचे काम केल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.
तोपर्यंत संबंधित महिलेचा हा व्हीडीओ पसरला होता. या व्हिडीओनंतर समाजमाध्यमांवर नागरिकांनीही आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली आहे.
वीजबिल थकवल्यास तातडीने कारवाई करणारी यंत्रणा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तितक्याच वेगाने सेवा का देऊ शकत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधीनी आणि विरोधात असलेल्या राजकीय पक्षांनी सामान्यांच्या या प्रश्नासाठी का आक्रमक भूमिका घेत नाहीत, असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे.
महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. महावितरण कंपनीला कोट्यावधी रूपयांचा महसूल वीजबीलातून मिळत आहे. तरीही पनवेल व नवी मुंबईतील जुनाट विजवाहिनी, बसबार, रोहीत्र बदलण्यासाठी आपत्तीवेळी अतिरीक्त मनुष्यबळ नेमावे. दुरूस्तीसाठी वीज साहीत्य पुरविणारी एजन्सी नेमावी अशी मागणी जोर धरत आहे.
