Under Swachh Bharat Mission-2023 spending crores of rupees for city painting in Navi Mumbai | Loksatta

X

नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; पण महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट

महापौर निवासासमोरील सार्वजनिक उद्यानाकडे व त्याच्या नामफलकाकडे पालिकेचे वर्षानुवर्ष लक्षच नाही. त्यामुळे याठिकाणी येणारे नागरिक पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत आहेत.

नवी मुंबईत शहर रंगरंगोटीसाठी करोडोंचा खर्च; पण महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट
नवी मुंबईत महापौर बंगल्यासमोरील उद्यान नामफलक बघतोय रंगरंगोटीची वाट

‘स्वच्छ भारत मिशन-२०२३ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छता विषयक उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरिता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती अंतर्गत पालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज आता ऑफलाइन भरता येणार; शेवटच्या दिवशी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ

२०२२ मध्ये नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला असून ही संपूर्ण नवी मुंबईकर नागरीकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करोडो रुपये खर्चातून नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी करत असताना दुसरीकडे ज्या पारसिक हिलवर महापौर निवासस्थान आहे. त्याच महापौर बंगल्यासमोरील सार्वजनिक उद्यानाचा फलक अनेक वर्षापासून दुर्लक्षित असून नामफलकाच्या रंगरंगोटीच्या प्रतिक्षेत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया, स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच पालिकेच्यावतीने विविध स्वच्छताविषयक स्पर्धेंचे आयोजन केले जाते. रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येते तर दुसरीकडे शहरातील हॉटेल्स, शाळा, विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था अशा अनेक घटकांच्यासाठी विविध स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.त्याचबरोबर देशात स्वच्छतेत शहराला प्रथम क्रमांक प्राप्त व्हावा म्हणून स्वच्छता स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळवण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्न करत असून असून ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन यशस्वीपणे राबविण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. दुसरीकडे चित्रकला स्पर्धा, भित्तीचित्र यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन पुढील काळात करण्यात येणार आहे.

हेही वाचा- बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना कायम नौकरीत समाविष्ट करा – आमदार मंदा म्हात्रे

स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील विविध चौक, रस्ते, ठाणे बेलापूर, सायन पनवेल महामार्ग,अंतर्गत रस्ते व आजूबाजूचा परिसर यांच्या रंगरंगोटीसाठी करोडो रुपये खर्च केले जातात. विवध चौकात मान्यवर कवी यांच्या कवितांच्या ओळी तसेच महाराष्ट्राची संसकृती दाखवणारी बोलकी चित्र नवी मुंबईत आलेल्या प्रत्येकाला आकर्षित करत असतात.करोनाच्या काळापासून नवी मुंबई महापालिकेत प्रशासकाद्वारे कारभार सुरु असून नवी मुंबई शहराचे प्रथम नागरीक असलेल्या महापौरांसाठीचे महापौर निवास व परिसर दुर्लक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या पारसिक हिल परिसरात महापौरांसाठीचे निवासस्थान आहे. त्याच महापौर बंगल्यासमोर असलेले सार्वजनिक उद्यान नामफलकाच्या रंगरंगोटीच्या प्रतिक्षेत आहे. एकीकडे नवी मुंबई शहरात स्वच्छ अभियाना अंतर्गत विविध उपक्रमासाठी करोडो रुपये रंगरंगोटीवर खर्च केले जात असताना दुसरीकडे महापौर निवासासमोरील सार्वजिनक उद्यानाचा फलक माझी रंगरंगोटी करता का रंगरंगोटी अशा स्थितीत आहे.नवी मुंबई शहरात दररोज पारसिक परिसरात हजारो नागरीक पहाटेपासूनच मॉर्निंग वॉकसाठी जात असतात.परंतू शहर रंगीबेरंगी छटांनी रंगलेल व रेखाटलेले असताना महापौर निवासासमोरील सार्वजनिक उद्यानाकडे व त्याच्या नामफलकाकडे पालिकेचे वर्षानुवर्ष लक्षच नाही. त्यामुळे याठिकाणी येणारे नागरीक पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करतात.

हेही वाचा- उरण: नवघर उड्डाणपुलावर खड्डे, अंधार आणि झाडे झुडपे; अपघाताची शक्यता

प्रशासकाच्या कार्यकाळात महापौर बंगल्याची शान….वर्दळ हरपली….

करोना काळापूर्वी लोकप्रतिनिधी असताना याच नवी मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या शासकीय निवासाची शान वेगळीच होती. सतत लोकप्रतनिधींचा राबता होता. परंतू प्रशासकाचा कारभार मागील दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरु असल्याने या महापौर बंगल्यावरील व आजुबाजुची वर्दळही हरपली असून सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणारे नागरीक मात्र महापौर बंगल्याच्या बाहेरच असलेल्या प्रशस्त उद्यानाच्या नामफलकाच्या दुर्लक्षाकडे बघून हळहळ व्यक्त करत आहे.

नवी मुंबई शहरात एकीकडे स्वच्छतेबाबत अनेक चांगल्या गोष्टी घडत असताना व शहराला स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक मिळालेला असताना दुसरीकडे अनावश्यक गोष्टींवर करोडो रुपये खर्च होत असल्याचा नाराजीचा सुरही उमटत असल्याचे चित्र आहे. पारसिक हिल येथील महापौर बंगल्यासमोरील उद्यानाच्यानामफलकाच्या रंगरंगोटीबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती बेलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:43 IST
Next Story
ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज आता ऑफलाइन भरता येणार; शेवटच्या दिवशी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ