सात वर्षांनंतरही पाणी साचत असल्याने प्रवाशांसाठी बंद

पनवेल : शीव-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाला सात वर्षे उलटली तरी या महामार्गावरील भुयारी मार्ग बंद आहेत. पावसाळ्यात पाणी साचत असल्याने ती सध्या डासांची पैदास केंद्रे झाली आहेत. भटक्या कुत्र्यांसारखे काही प्राणी या मार्गात राहात आहेत.

या भुयारी मार्गासाठी कोटय़वधी रुपये खर्च केला तरी ते वापरायोग्य होत नसल्याने नागरिकांकडून संपात व्यक्त होत आहे. सिटिझन युनिटी फोरमने हे जीवघेणे भुयारी मार्ग बंद करावेत किंवा ते वापरायोग्य करावेत अशी मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मे २०१४ मध्ये कळंबोली ते मानखुर्ददरम्यान शीव-पनवेल महामार्गाचे काम हाती घेतले. आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केला आहे. मात्र या टप्प्यातील नेरुळ, खारघर, रोडपाली, कामोठे व कळंबोली येथील भुयारी मार्ग सात वर्षांनंतरही वापराविना पडून आहेत. यामध्ये पावसाळी पाणी साचत असल्याने या पाण्याचा निचरा कसा करावा, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पडला आहे.

‘कफ’ या संस्थेने कामोठे येथील प्रवाशांच्या प्रश्नावर अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कळंबोली ते कामोठे हा रस्ता सुरू करण्यासाठी कामोठेतील ‘कफ’चे सदस्य नेहमीच आग्रही राहिले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा रस्ता नगरसेवक विजय खानावकर यांनी प्रवाशांसाठी खुला केला. त्यानंतर ‘कफ’ने भुयारी मार्गाच्या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे या प्रश्नी लेखी निवेदन दिले आहे.

कामोठेसह शीव-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणात बांधलेले इतर भुयारी मार्ग पाण्याखाली आहेत. बांधणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने हा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.  ही ठिकाणे डासांची पैदास केंद्रे झाली आहेत. याची दुरुस्ती तातडीने व्हावी व ती नागरिकांसाठी खुली करावीत.

– रंजना सडोलीकर, सचिव, कफ संस्था