पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाचे दु:ख असून या महामार्गाच्या बांधकामाविषयी काही बोलण्यासारखे आहे, मात्र काही सांगण्यासारखे नाही अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पनवेल व्यक्त केली आहे. पनवेल येथील खारपाडा गावाजवळ पनवेल ते कासू या ४२ किलोमीटर रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई गोवा महामार्गाच्या बांधकामाची सूरुवात १३ वर्षापुर्वी केली. मात्र अनेक अडचणींचा सामना करुनही या मार्गाचे काम पुर्ण होऊ शकलं नसल्याकडे केंद्रीयमंत्री गडकरींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. महामार्गातील भूसंपादन,पर्यावरण विभागाची परवानगी आणि महामार्ग बांधणा-या ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हा मार्ग रखडल्याचे त्यांनी सांगीतले.अजूनही महामार्गातील काही वारसदारांनी भूसंपादनाला परवानगी दिली नसल्याचे मंत्री गडकरी म्हणाले. कोकणाच्या रखडलेल्या महामार्गावर पुस्तक लिहीले जाऊ शकते अशी उपरोधिक टीका यावेळी गडकरी यांनी केली. हा महामार्ग बांधकामासाठी ४० वेगवेगळ्या बैठका झाल्या. यंदा वर्षअखेरपर्यंत महामार्गाचे ८४ किलोमीटरचे कॉंक्रीटीकरणाचे बांधकाम पुर्ण होईल असे आश्वासन यावेळी मंत्री गडकरी यांनी दिले.