नवी मुंबई : तब्बल ६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबईला महापौर मिळाला आहे. भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील या बिनविरोध महापौर म्हणून निवडून आल्या असून, भाजपचेच उमेदवार दशरथ भगत यांची बिनविरोध उपमहापौर म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेने (शिंदे) आपल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज ऐनवेळी माघारी घेतल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. यानिमित्ताने नवी मुंबईत पहिल्यांदाच भाजपची एकहाती प्रस्थापित केली आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय लढत होण्याची शक्यता होती. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळालेली राजकीय चुरस महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा दिसून आली.
शिवसेनेच्या वतीने दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली होती. भाजपकडे ६५ + १ असे स्पष्ट बहुमत असतानाही ही लढत चर्चेचा विषय ठरली होती.
दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये महापौर-उपमहापौर पदासाठी चुरस रंगली असतानाच गुरूवारी झालेल्या पहिल्या महासभेच्या सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी दाखल करण्यात आलेला नामांकन अर्ज मागे घेण्यात आला, त्यामुळे भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील यांची बिनविरोध महापौर म्हणून निवड झाली.
यानंतर उपमहापौर पदासाठीही शिंदे गटाने नामांकन अर्ज मागे घेतला, त्यामुळे भाजपचे उमेदवार दशरथ भगत हे बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले.
महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेतील भाजपची भूमिका अधिक भक्कम झाली असून, येणाऱ्या काळात नवी मुंबईच्या विकासासाठी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर कशाप्रकारे भूमिका बजावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने युती धर्म पाळला
राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीचा भाग असले तरी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर घणाघाती आरोप प्रत्यारोप केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. आधी निवडणुकीच्या ऐनवेळी तुटलेल्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील महायुती अंतर्गत तणाव अधिक तीव्र झाला होता. परंत, स्थानिक राजकारणात विषय अधिक ताणून न ठेवता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युतीधर्माचे पालन करून उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी केली. भाजपने युती धर्म पाळला नसला तरी वरिष्ठांचा आदेश म्हणून आम्ही युती धर्माचे पालन करत असल्याचे हळदणकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

