विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक; नवी मुंबईत ६० वाहनांवर कारवाई

शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक नवी मुंबईमध्ये सुरक्षित नसल्याचे ‘आरटीओ’ने केलेल्या कारवाईत समोर आले आहे.

विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक; नवी मुंबईत ६० वाहनांवर कारवाई
विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक

नवी मुंबई : शालेय बस आणि व्हॅनमधून होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक नवी मुंबईमध्ये सुरक्षित नसल्याचे ‘आरटीओ’ने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. २६ जुलैपासून विशेष मोहीम घेऊन ६० वाहनांवर कारवाई करून ८९ हजार दंड वसूल केला आहे.  यात वेगमर्यादेच्या उल्लंघनासह क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक तसेच वाहनात अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने यासाठीच्या नियमांना बगल देत वाहतूक करीत आहेत. त्यामुळे शालेय वाहनांची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर उप प्रादेशिक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर आरटीओ व नवी मुंबई शिक्षण विभागाच्या वतीने या वाहनचालकांची एक बैठक घेत नियमावलीतील तरतुदीचे पालन करावे, विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येऊ नये, अशा वाहनमालकांनी नियमावलीची पूर्तता करून विद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही शहरात नियमांना पायदळी तुडवत विद्यार्थी वाहतूक होत आहे. त्यामुळे वाशी आरटीओने एक मोहीम हाती घेत या वाहनांचा वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाचा परवाना बॅच यांची तपासणी केले. यात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतुकीचे प्रमाण अधिक होते. आशा एकूण  ६० बसचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ८९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती वाशी उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली.

महिला कर्मचाऱ्यांविना वाहतूक

बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत महिला कर्मचारी असावा असा नियम आहे; परंतु नवी मुंबई शहरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ६० टक्के वाहनांत महिला कर्मचारी उपस्थितीत नव्हत्या. तसेच वाहन परवाना आणि योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

कारवाई अशी

  • वेगमर्यादा उल्लंघन   ५
  • आसन क्षमता                       ४  
  • योग्यता प्रमाणपत्र                  ३२
  • विमा प्रमाणपत्र                     १३
  • महिला कर्मचारी                     ११
  • अग्निशमन यंत्रणा नसणे        ४
  • इतर नियमावली                   ३२ 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unsafe transportation students action against 60 vehicles navi mumbai ysh

Next Story
आरक्षण सोडतीवर केवळ एक हरकत; निवडणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी