आवक घटली; अंजिराच्या बाजारावरही मळभ

नवी मुंबई: महाबळेश्वर, पाचगणी, वाई पट्टय़ात अवकाळी पाऊस पडल्याने त्याचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसला असल्याचे मत वाशी एपीएमसीमधील घाऊक फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आधी ५-६गाडय़ा दाखल होत होत्या. ते आता २-३ गाडय़ांची आवक होत आहे.

साधारणत: नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीच्या हंगामाला सुरुवात होते. मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडल्याने सुरुवातीच्या पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. स्ट्रॉबेरी पिक घेण्याची वेळ आणि त्यात अवकाळी पाऊस यामुळे फळ भिजण्याचे प्रमाण वाढले असून परिणामी भिजलेली स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत असल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. सुरुवातीला ५०० क्रेट स्ट्रॉबेरी दाखल झाली होती, परंतु आता आवक घटली असून ते प्रमाण २०० क्रेटवर आले आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात अधिक प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यापर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो.

 साध्य घाऊक बाजारात पाव किलो स्ट्रॉबेरी प्रतिकिलोला १०० रु ते ४००रु बाजारभाव आहेत. त्याचबरोबर अंजीर फळाचा ही हंगाम सुरू झाला असून त्यावरही ही अवकाळी पावसाचा परिणाम झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीला चार ते पाच हजार बॉक्स येत होते ते आता १००० बॉक्सवर आले आहे. सध्या एपीएमसी बाजारात पुरंदर, सासवड, वेल्ला या ठिकाणाहून दाखल होत असून चार डझनला १०० ते ३०० रु बाजारभाव आहे.

सध्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. १५ नोव्हेंबरपासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो. स्ट्रॉबेरी उत्पादन घेणाऱ्या भागात पाऊस पडल्याने भिजलेली स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत आहे, त्यामुळे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

– संजय पिंपळे, घाऊक फळ व्यापारी, एपीएमसी