नवी मुंबई राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांचे संकेत

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुका करोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. एकसदस्यीय पद्धतीने प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी केली असून प्रभागरचनाही निश्चित झाली आहे. मात्र गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. यात आगामी महापालिक निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या आतापर्यंत एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणुका झाल्या आहेत. बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्यास या पद्धतीचा फायदा आघाडीला की भाजपला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर सर्वच पक्ष स्वतंत्र लढले तर बहुसदस्यीय पद्धतीत काय होणार? याच्याबाबत राजकीय आडाखे रंगवले जाऊ  लागले आहेत.

शासनाने बहुसदस्यीय पद्धत राबवली तर इच्छुकांना आता फक्त १ प्रभागात नव्हे तर ४ प्रभागांत म्हणजेच १ पॅनेलमध्ये आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे. प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांना मोठी कसरत करावी लागेल.

नवी मुंबई महापालिकेची मागील निवडणूक ही २७ एप्रिल २०१५ रोजी झाली होती तर ९ मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली होती. हा कार्यकाळ कधीच संपला आहे. मात्र करोनामुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

२०११च्या जनगणनेनुसार नवी मुंबईतील लोकसंख्या ही ११ लाख १९ हजार ४७७ इतकी आहे. त्यामुळे या लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची पुर्नरचना करण्यात आली होती. बहुसदस्यीय पद्धतीने २ ते जास्तीत जास्त ४ प्रभागांचा एक पॅनेल होऊ शकते. नवी मुंबईत सध्या १११ प्रभागांची एकसदस्यीय पद्धतीने प्रभागरचना निश्चित असून त्या दृष्टीने इच्छुकांची गेल्या दीड वर्षांपासून मोर्चेबांधणी सुरू आहे.

शहरांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्षात आयुक्तांची भेट

या बैठकीत अजित पवार यांनी प्रत्येक शहरात त्यांचे स्थानिक प्रश्न आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक शहरात जात तेथील महापालिका व पोलीस आयुक्तांची भेट घेत तेथील प्रश्नाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर शासनस्तारवर हे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून अजितदादांनी बहुसदस्यीय पद्धतीबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार व कोणत्या पद्धतीने निवडणुका होणार हे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही पक्षाकडे एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

  -अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही  एकसदस्यीय पद्धतीने करण्याबाबतचे नियोजन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे. जर बहुसदस्यीय पद्धत केली तर प्रक्रिया नव्याने राबवावी लागेल. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेला नाही.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महपालिका