Upper District Collector takes action pump sand in Panvel news ysh 95 | Loksatta

पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका

पनवेल व नवी मुंबई खाडीपात्रात कांदळवनांची कत्तल करुन अवैध वाळुउपसा राजरोस सूरु असून वेळोवेळी कारवाईनंतर वाळुमाफीया मोकाट असल्याची ओरड केली जात होती.

पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पनवेल: पनवेल व नवी मुंबई खाडीपात्रात कांदळवनांची कत्तल करुन अवैध वाळुउपसा राजरोस सूरु असून वेळोवेळी कारवाईनंतर वाळुमाफीया मोकाट असल्याची ओरड केली जात होती. याबद्दल रायगड  जिल्हाधिका-यांनी अप्पर जिल्हाधिकारी व पनवेलच्या तहसिलदारांना ठोस कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत रात्रीच्या काळोखात १० विविध बार्ज सरकारी यंत्रणेच्या हाती लागले. आतापर्यंत पनवेलच्या तहसिलदारांनी 36 वेळा कारवाई करुन ५० हून अधिक बार्ज उध्वस्त केल्या. मात्र ठाणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीच्या वादाचा फायदा उचलत नेहमी वाळुमाफीया खाडीक्षेत्रातून इतर हद्दीत मोकाट लपत होते.

गुरुवारच्या कारवाईत अप्पर जिल्हाधिकारी अमोल याव यांनी ठाणे जिल्ह्याच्या कारवाई करणा-या यंत्रणेला सोबत घेतल्याने एकाचवेळी रायगडसह ठाणे जिल्ह्यातील सर्वच यंत्रणेने खाडीक्षेत्रात सापळा रचून वाळु उपसा करणा-यांचे कोट्यावधी रुपयांचे साहीत्य जप्त केले. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सूरु असलेल्या धडक कारवाईमध्ये वाळु उपशासाठी वापरात असलेल्या १० विविध बार्ज ताब्यात घेण्यात आल्या. यामध्ये ४ मोठे बार्ज आणि ४ मध्यम बार्ज तसेच २ छोटे सक्शंन मोटारपंपच्या बोटी अशा १० विविध बोटींवर धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली. आजपर्यंतची पनवेल महसूल विभागाची ही दिड वर्षात ३७ वी कारवाई आहे.

हेही वाचा >>> जेएनपीटी लाँच सेवा गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यावरून; ‘नेव्ही डे’साठी चार दिवस गेटवे धक्का बंद

खारघर, कामोठेपासून ते वाघिवलीपर्यंत खाडीपात्रात वाळु उपसा सूरु असल्याची ओरड पर्यावरणवाद्यांकडून सूरु आहे. स्थानिक मासेमा-यांना याबाबत विचारल्यावर ते आकाश, विकास, शिवा, रोशन आणि इमरान अशा व्यक्तींच्या माध्यमातून हा उपसा सूरु असल्याचे सांगतात. मात्र या व्यक्तींना आजपर्यंत कोणीही पाहीलेले नसल्याचे सांगतीले जाते.  या माफीयांकडे असणारे मजूरांकरवी वाळु उपसा केला जातो. मात्र महसूल विभागाची बोट दिसल्यावर संबंधित मजूर बार्ज सोडून पाण्यात उड्या मारुन तेथून पळून जातात. खाडीपात्रातील गाळामुळे महसूल विभागाची कारवाईसाठी आलेल्या बोटीतून या मजूरांना पकडणे अशक्य असल्याने महसूल विभागाला आजपर्यंत ३७ कारवाईत एकही मजूर सापडला नाही. खाडीपात्रातील वाळु उपशावर कायमस्वरुपी कारवाई करण्यासाठी संघटीत गुन्हेगारीचे कलम या वाळु उपसा करणा-यांवर लावणे तसेच महसूलसह, सागरी पोलीस, स्थानिक पोलीस आणि सागरी सूरक्षा दर अशांचे संयुक्त पथक असणे आवश्यक आहे. या सर्व सरकारी यंत्रणेचे संयुक्त पथक स्थापन होत नसल्याने  खारघर, बेलापूर, वाघिवली अशा खाडीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळु उपसा आजही केला जातो.

हेही वाचा >>> पनवेल: कर्णकर्कश आवाजाचे ४७ सायलेन्सर नष्ट

महसूल विभागाच्या कारवाईत आरोपी सापडत नाही याला हेच संयुक्त पथक जबाबदार आहे. गुरुवारच्या कारवाईसाठी सकाळी दहा वाजल्यापासून अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव हे पनवेलमध्ये ठाण मांडून होते. तहसिलदार तळेकर यांनी मंडळ अधिकारी तलाठी यासाठी एकत्र झाले मात्र खाडीपात्रात जाण्यासाठी समुद्राला भरती दुपारी तीन वाजता आली. त्यानंतर पथक सक्रीय झाले. अनेक मैल लहान बोटीचा प्रवास झाल्यानंतर काही बार्ज दिसल्या मात्र महसूल अधिका-यांची बोट दिसल्यावर नेहमीप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून वाळु उपसा करणारे पळून ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत पळू लागले. नेहमीप्रमाणे पळणार असल्याचे माहीत असल्याने अप्पर जिल्हाधिकारी यादव व तहसिलदार तळेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर आणि सागरी पोलीसांसह तेथील स्थानिक तहसिलदार व त्यांच्या पथकाला तेथे तैनात राहण्याचे आदेश दिले. अखेर रात्रीपर्यंत खाडीक्षेत्रात गस्त राहीली. रात्रीच्या अंधारात दिसण्यासाठी खास आकर्षक दिव्याचा बंदोबस्त करण्यात आला.

हेही वाचा >>> नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…

अखेर वाळु उपसा करणा-या बार्ज किनारपट्टीला लावण्याचे ठिकाण सरकारी यंत्रणेच्या हाती लागले. या कारवाईत जागीच काही बार्ज व सक्शंनपंप कटरच्या साह्याने कापण्यात आले. तर २ बोटी एन.आर.आय. पोलीसाच्या ताब्यात देण्यात आल्या.  संबधिताविरुध्द एन.आर.आय. पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ बोट गाळामध्ये फसली असल्याने जागेवरती नष्ट करण्यात आली आहे व १ बोट एन.आर.आय. पोलीसानी ताब्यात घेतली असुन त्यावर कार्यवाही चालु आहे. तसेच ५ संक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत. अशा प्रकारे धडक कार्यवाही आज पुर्ण करण्यात आली आहे. स्थानिक मासेमा-यांना आणि खाडीक्षेत्रालगत शेतमळे फुलविणा-यांवर या वाळुमाफीयांबद्दल विचारल्यावर त्यांनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर पाच नावे सांगीतली. मात्र ही मंडळी कोण याबाबत कोणालाही माहित नसल्याचे या स्थानिकांनी सांगीतले. अप्पर जिल्हाधिकारी यादव आणि तहसिलदार तळेकर यांच्या शोध पथकाला पनवेलचा पर्यावरण -हास करणा-यांचा शोध पोलीस यंत्रणेप्रमाणे घ्यावा लागणार आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 13:10 IST
Next Story
उरण मध्ये गोवरचा संशयित रुग्ण