उरण : गेली महिनाभर दडी मारलेल्या पावसाने उरण परिसरात बुधवार व गुरुवार या दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली. यामुळे खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला तर रानसई धरणातील पाणी पातळी वाढल्याने पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

महिनाभरात १ जुलै रोजी पहिल्यांदाच १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची झाली आहे. हवामान विभागाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. त्यानंतर दोन-चार दिवस परिसरात पावसाच्या हलक्या सरी तर कुठे रिमझिम पाऊस बरसला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली होती. खुरपणी, नांगरणी करून भात बियाणांची पेरणी केली होती. मात्र मागील १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्यात आलेली भात बियाणे करपण्यास सुरुवात झाली होती.

त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. मात्र बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या हजेरीमुळे महिन्याभरापासून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग घेतला आहे. दोन दिवसांच्या पावसाने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नांगरणीच्या कामात मग्न झाले आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसामुळे खोळंबलेल्या शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. उशिराने का होईना पावसाच्या आगमनाने परिसरातील शेतकरी सुखावला आहे.