उरण : पावसाच्या सुरुवातीला येणाऱ्या बोंबील(बॉम्बे डक) या माशाचे बाजारात आगमन झाले आहे. मात्र मासेमारी बंदीमुळे आवक कमी असल्याने या माशाचा दर नगाला शंभर रुपयांवर पोहचला आहे. हा दर पाहून खवय्ये आवक झाले आहेत. यात आकारा नुसार कमी दरांचेही बोंबील मिळत असले तरी गोरगरीब मांसाहारी खवय्यांचे अन्न म्हणून ओळख असलेल्या बोंबील माशाला पहिल्यांदाच चढे दर मोजावे लागत आहेत. मात्र याची आवक वाढल्यानंतर दहा नगांचे पन्नास ते शंभर रुपये दर होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात मांसाहारी मंडळींकरिता बोंबील ही मेजवानी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळी बाजारात या हंगामातील बोंबील अगदीच थोडय़ा प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. नगाला १०० ते ५० (आकारानुसार) रुपये अशी त्यांची विक्री होत असल्याने मासळीप्रेमी अवाक झाले आहेत.
बोंबील पावसाळ्यातच मोठय़ा प्रमाणात मिळत असल्याने त्याचा आस्वाद याच काळात घेतला जातो. ही मासळी कोकणी माणसाचे आवडते खाद्य. जून महिन्यापासून पावसाळी मासेमारीवर बंदी घालण्यात येते. त्यामुळे मासळीची आवक घटते. सध्या इतरही मासळी उपलब्ध नसल्याने नव्या हंगामात आलेल्या बोंबील माशांचे दर वाढलेले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत बोंबलांचे दर एका नगाला ५० रुपये होते. ते यंदा दुप्पट झाल्याची माहिती मासळी खवय्ये नितीन पाटील यांनी दिली. हंगामातील पहिले बोंबील खाण्याची इच्छा असतानाही दरवाढीमुळे ते खाता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
बोंबिलाचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. त्यांचे प्रमाण कमी असल्याने आम्हाला चढय़ा दराने बोंबील खरेदी करावे लागतात आणि वाढीव दराने त्यांची विक्री करावी लागते. हळूहळू आवक वाढल्यानंतर सर्वसामान्यांच्या आवाक्यातही बोंबील येतील. येत्या काही दिवसांतच मासेमारीवरील बंदी उठणार असल्याने त्यानंतर बोंबिलाचे दर कमी होण्याची अपेक्षा आहे. मासे विक्रेत्या कुंदाबाई कोळी यांनी दिली.
हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर, विशेषतः कोकणात अत्यंत लोकप्रिय असलेला एक प्रसिद्ध मासा आहे. याचे मांस अतिशय मऊ आणि चवदार असते. प्रामुख्याने याचे कुरकुरीत बोंबील फ्राय, झणझणीत सुक्या बोंबीलाची चटणी/मसाला आणि ओल्या बोंबीलाचे कालवण (रस्सा) आवडीने खाल्ले जाते.बोंबील (Bombay Duck) खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते कारण यामध्ये प्रथिनांचे (protein) प्रमाण उच्च असते आणि चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, कॅल्शियम, लोह, आणि व्हिटॅमिन ‘ए’ व ‘डी’ मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य, हाडे आणि डोळे निरोगी राहतात असा तज्ञांचा दावा आहे.
बोंबील आणि ब्रिटीश
मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या ‘बोंबील’ या माशाला इंग्रजांमुळे ‘बॉम्बे डक’ (Bombay Duck) हे अत्यंत गमतीशीर नाव मिळाले.ब्रिटिश राजवटीत हा वाळवलेला मासा टपाल गाड्यांमधून (पोस्ट) नेला जात असे. त्याकाळी पोस्टाला ‘डाक’ म्हटले जाई, ज्याचा अपभ्रंश होऊन याला ‘बॉम्बे डक’ असे नाव पडले.
मासेमारी बंदी नंतर आवक वाढणार : सध्या १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधी करीता खोल समुद्रातील मासेमारी बंदी आहे. मात्र साध्या नौकातून किनाऱ्यावर मासेमारी सुरू असून यामुळे आवक कमी आहे. परंतू मासेमारी बंदी उठल्यानंतर यात वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे दरही कमी होतील.
