उरण : उरण शहराला जोडणाऱ्या बाह्यवळण (बायपास)मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ नेते उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचा उरण मधील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवार, ३१ ऑक्टोबरला बाह्यवळण (बायपास मार्ग) कोटनाका, उरण येथे नागरी सत्कार करण्यात आला. २००८ साली उरणच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या सत्काराचे आयोजक उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, आधार सावली फाऊंडेशनच्या रेश्मा म्हात्रे व उरण उत्कर्ष समितीचे दीपक गावंड उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

 हा सत्कार सोहळा उरण सामाजिक संस्था, आधार सावली फाऊंडेशन व उरण उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  यावेळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,कामगार नेते कॉ. भूषण पाटील,ऍड. विजय पाटील,संदीप पाटील,संतोष पवार  यांच्यासह अनेक मान्यवरांनी गोपाळ पाटील यांच्या कार्याचा गौरव केल. यापूर्वी त्यांनी खोपटे खाडीपूल,करळ रेल्वे फाटक आदी मार्गासाठी त्यांनी आंदोलन केले. उरण तालुक्यातील व शहरातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी या सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होती.शहराच्या  रोजच्या जीवघेण्या वाहतूककोंडीतून मुक्त करण्यासाठी पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या   उरण बाह्यवळण मार्ग(बायपास) मार्गाचे रविवारी अखेर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. त्यामुळे उरणच्या नागरीकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

त्यासाठी मार्गाच्या उर्वरित कामाला वेग आला आहे.  वाहतुकीमुळे कोंडणारा श्वास मोकळा होणार आहे. या मार्गावरील उरण शहरात जाणारा जोडमार्ग रखडला असला तरी उरण शहरा पर्यंत जाणारा मार्ग पूर्ण करण्यात आलेला असून या मार्गावर वाहतूक सुरू करण्याची मागणी उरणच्या नागरीकांकडून करण्यात आली होती. मात्र जोड मार्गासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून निधी मंजूर होताच बाह्यवळण मागांचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल अशी माहीती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. उरणच्या वाहतूक कोंडीत सध्या प्रचंड भर पडली असून नागरीक त्रस्त आहेत. काही मिटरच्या अंतरासाठी काही मिनिटे घालवावी लागत आहेत. यात सणांच्या गर्दीची भर पडत आहे. या समस्येवर उपाय म्हणून सिडको कडून उरण पनवेल मार्गावरील पेट्रोल पंप ते उरण मोरा मार्ग असा बाह्यवळण मार्ग सुरु करण्यात आला आहे.

हा महत्वपूर्ण मार्ग २००८ पासून रखडला होता. या मार्गामुळे उरणच्या प्रवासी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.  उरण शहर आणि परिसराचे झपाट्याने नागरीकरण सुरू आहे. येथील लोकल,रस्ते मार्ग ,जलमार्ग यांनी जोडले गेले आहे. त्यामुळे नागरीवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. उरणच्या सर्व मार्गावर सततच्या कोंडीने प्रवासी, नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली होती. २००८ ला  सिडकोच्या निधीतून बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या मार्गात कांदळवन असल्याने त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात वाढ झाली. आता ४५ कोटींच्या घरात या बाह्यवळण मार्गाचा खर्च आता ५५ कोटींवर गेला.