उरण : वाढत्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी उरण पोलिसांनी उरण तालुक्यात १०७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र यासाठी आवश्यक असलेली वीज जोडणी विविध विभागाकडून मिळत नसल्याने हे कॅमेरे बंद आहेत. ते त्वरित सुरू करावी यासाठी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी विविध आस्थापणानाशी पत्रव्यवहार केला आहे. अशी माहीती त्यांनी दिली आहे. यासाठी उरण तालुक्याचे चार भाग करण्यात आले आहेत.
यात उरण शहर,बोकडवीरा,कोप्रोली आणि जासई असे हे विभाग असून येथील पोलीस,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांचा समावेश असणारे समाजामध्यम गट तयार करण्यात आले आहेत. यातून विभागीय माहीती पोलीस यंत्रणेला अपेक्षित आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाढते गुन्हे समाज विघातक कृत्य यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात उरण नगर परिषद परिसरातील १०७ सीसीटीव्ही कॅमेरे पुढील आठवडया पासून सुरू होणार आहेत.
शहर बिट मध्ये २८ कॅमेरा, चिरनेर बिट, जासई, बोकडविरा .. प्रत्येक बिट मध्ये २५ कॅमेरे यातील अटल सेतू परिसरात १२ , नगरपरिषद १०५ द्रोणागिरी,राष्ट्रीय महामार्ग १२ ओएनजीसी -६ सिडको विभाग १६ असे कॅमेरे आहेत. तर या चार खाजगी बिट मध्ये एकूण १०० कॅमेरे निश्चित करण्यात आले आहेत. यातील उरणच्या रेल्वे व सिडको द्रोणागिरी परिसरात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र या कॅमेऱ्याना वीज जोडण्या नसल्यामुळे बंद आहेत.
एक कॅमेरा जनतेसाठी मोहीम : उरण पोलीस विभागाने उरण शहर व तालुक्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच खाजगी दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दिशा बदलून त्या पोलीस तपासात उपयोगी पडतील आशा दिशेने वळवून घेण्यात आले आहेत. या मोहिमेला एक कॅमेरा जनतेसाठी असे नाव देण्यात आले असल्याची माहीती यावेळी हनिफ मुलाणी यांनी दिली आहे.
जुलै २०२४ मध्ये उरण- पनवेल या रहदारीच्या मार्गावर झालेल्या तरुणीच्या हत्याकांडानंतर उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर, मागील अनेक वर्षापासून उरण शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र होते. याकडे उरण नगर परिषद व सुरक्षा यंत्रणेचेही दुर्लक्ष व दिरंगाई होतांना दिसत होती.
मुंबई आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या अटल सेतू आणि रेल्वे सेवेमुळे हे अंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांवर आले आहे. त्यातच, उरण तालुक्यातील वाढते व्यवसाय, कंटेनर यार्ड्स आणि बंदर यामुळे हजारो रहिवासी हे दररोज येजा करीत आहेत. यामुळे, उरण परिसरातील फ्लोटिंग लोकसंख्या वाढली असून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली असून हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, उरण शहरातील बाजारपेठ ही तालुक्यातील व्यावसायिक आणि रहिवाशांसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने दररोज हजारो रहिवासी हे बाजारहाटासाठी येत असतात. त्यातच, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही हे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ‘तिसरा डोळा’ बंद झाला होता. तसेच, गेल्या वर्षभरापूर्वी उरण शहर आणि परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलीसांकडून देण्यात आला होता.
उरण शहरातील बंद सीसीटीव्ही सुरू करून शहरातील हालचालीवर नियंत्रण ठेण्यासाठी कक्ष उभारण्यात आलाअसून याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार त्याची कार्यवाही सुरू असल्याची माहीती उरण पोकुसना दिली आहे. तर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी आणि शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चारफाटा येथे तसेच, उरण शहरातील शाळांच्या बाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. यामुळे, उरण शहरातील बाजारपेठ, बाग आणि रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
