उरण : नैसर्गिकरित्या ओल्या जमीनीत येणाऱ्या चविष्ट वालाच्या शेंगा तयार झाल्या असून या शेंगांची बाजारात आवक वाढली आहे. यात उरण आणि चिरनेर मधील या वालाच्या शेंगांना आता मागणी वाढू लागली आहे. या शेंगांचा सुरुवातीचा दर हा किलोला १५० ते १६० इतका आहे. मात्र मागणी वाढल्यास यात वाढ होण्याची शक्यता आहे. या वालाच्या प्रतीक्षेत असलेल्या खवय्यांनी आता पुन्हा एकदा वालाच्या पोपटीना सुरुवात केली आहे.

उरण तालुक्यात सध्या वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त ठरला आहे. थंडीत पडणाऱ्या दवावर हे पीक तयार होते. जेवढी जास्त थंडी तेवढे हे पीक मोठ्या प्रमाणावर भरघोस असे येते. दरम्यान ही पिके तयार होण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे खूप थंडी व दव पडल्याने वाल व चवळीच्या शेंगांच्या पिकांमध्ये भरघोस वाढ झाली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात येणाऱ्या ग्रामीण भागातील कळंबुसरे, कोप्रोली, नागाव ,केगाव ,साई, दिघाटी, केळवणे, खारपाडा या परिसरातील गावात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकासाठी जास्त मेहनत नाही. परंतु या पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो. वालाची झुडपे हे जंगली वानरे आणि रानटी डुकरे तसेच गुरे यांचे आवडते खाद्य असल्यामुळे या प्राण्यांना त्या पिकांच्या नासाडी पासून वाचविण्यासाठी येथील शेतकऱ्यांना खूप मेहनत घेऊन, शेताची राखण करावी लागते.

वाल व चवळीच्या शेंगांचा उत्पन्नाचा फायदा किमान ८० ते ९० हजार रुपयांवर मिळतो. जे शेतकरी वाल चवळीची शेती पिकवित आहेत.त्यांना या पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस शेतावरच मुक्काम करावा लागत आहे. तेव्हा कुठे हे पीक हाती लागते. या पिकांवर जंगली वानरांची व जंगली उनाड गुरांची वक्रदृष्टी असल्यामुळे येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांच्या उत्पादनाला मुकतात.
-कृष्णा म्हात्रे, शेतकरी

ब्लर्ब

वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त ठरला आहे. थंडीत पडणाऱ्या दवावर हे पीक तयार होते. जेवढी जास्त थंडी तेवढे हे पीक मोठ्या प्रमाणावर भरघोस असे येते.