उरण : पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे भारतात घरगुती गॅसचा तुटवडा भासू लागल्याने सध्या पारंपरिक मातीच्या चुलींना मागणी वाढली आहे. एकल आणि दुहेरी अशा दोन प्रकारच्या चुली विक्रीसाठी असून सिंगल चुलीचा दर २५० रुपये आहे तर दोन चुलींचा दर ४०० रुपये आहे.

इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाच्या परिणामी घरगुती गॅस पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे दैनंदिन अन्न शिजविण्यासाठी घरोघरी आता मातीच्या चुलींची मागणी वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहर आणि ग्रामीण भागातही लाकूड फाट्यावर चालणाऱ्या चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. उरणसारख्या निमशहरी परिसरात आता ९० टक्के पेक्षा अधिक घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून अन्न शिजवल जाते. मात्र आखाती युद्धस्थितीमुळे घरगुती गॅसपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांनी एक सिलिंडर मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी गॅसचा पर्याय म्हणून पारंपरिक चुलींचा वापर सुरू केला आहे.

गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेलमध्येही व्यवसाय टिकविण्यासाठी गॅस ऐवजी विटांच्या चुली तयार करून त्यांच्यावर हॉटेलमधील खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. या प्रकारच्या खाद्यपदार्थासाठी ग्राहकांना अधिकचा दर भरावा लागत आहे.

अनेक वर्षांपासून मागणी नसल्याने मातीच्या चुली बनविणे बंद करण्यात आले होते. मात्र घरगुती गॅसपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी सध्या चुलींचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मातीच्या चुलींना मागणी वाढली आहे.-श्रीरंग चौलकर, चूल विक्रेते