दहशतवादी हल्ल्यांसंदर्भातील इशाऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर गस्त वाढवण्याची मागणी

मुंबईवरील दशहतवादी हल्ल्यानंतर अनेकदा सागरी मार्गाने हल्ले होण्याचे इशारे गुप्तवार्ता विभागाकडून वारंवार दिले जात असून मुंबई शहरापासून जवळ असलेल्या उरणचे संवेदनशील सागरी किनाऱ्यांची गस्त कधी वाढवणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. उरण परिसरात जेएनपीटी बंदर ओएनजीसी तसेच मोरा व करंजासारखी बंदरे व जागतिक ठेवा असलेले घारापुरी बेट आहे. त्यामुळे मुंबई शहरांवर होणाऱ्या संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर सागरी मार्ग म्हणून उरण शहराची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे.

सागरी मार्गाने देशावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे संकेत गुप्तचर विभागाकडून देण्यात आले आहेत. अशा वेळी सागरी किनाऱ्यावरील गस्त वाढण्याची गरज असून उरणमधील  किनाऱ्यावर ज्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा हवी तेवढी दिसत नसल्याचे समोर येत आहे. अरबी समुद्राचा किनारा असलेल्या उरणमधील करंजा, मोरा, पिरवाडी, केगाव या ठिकाणावरून बोटीच्या मार्गाने उरण मध्ये प्रवेश करणे सहज शक्य आहे.

पोलीस चौकीला टाळे

काही महिन्यांपूर्वी उरणमध्ये दहशतवादी पाहिल्याची अफवा पसरलेली होती. त्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा जागी झाली होती. तर मुंबई हल्ल्यानंतर सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी सागरी पोलीस ठाण्याचीही उभारणी करण्यात आलेली आहे. ओएनजीसीच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर दोन चौक्या आहेत. या चौक्यातून तसेच सागरी किनाऱ्यावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)चे जवान २४ तास गस्त घालतात. मात्र पोलिसांसाठी असलेल्या चौकी मात्र बंद आहेत.

उरणमधील सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून दोन बोटी तसेच २५ पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून किनाऱ्यावर गस्त घातली जाते. त्याचप्रमाणे नवी मुंबई व उरण पोलिसांकडूनही या परिसरात गस्त घातली जात आहे.

  – बी.एस.बुधवंत, साहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा विभाग.