उरण : येथील नवघर औद्योगिक परिसरात जेएनपीए ते पळस्पे राष्ट्रीय महामार्गा नजीक रविवारी सायंकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी २.४ रिक्तर स्केलचा धक्का जाणवला आहे. त्यामुळे उरण मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने व उरणच्या महसूल विभागाने याची पुष्टी केली आहे.

उरण हे राज्यातील महत्वाचे औद्योगिक ठिकाण आहे. याच तालुक्यातील ज्या नवघर येथे हा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याच ठिकाणी अवघ्या पाच किलोमीटरवर जागतिक जेएनपीए बंदर आहे. तर एक किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोलियमचा घरगुती वायू प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प व वायू विद्युत केंद्र ही हाकेच्या अंतरावर आहे.

जगातील अनेक देशातून आयात करण्यात येणाऱ्या कोट्यवधी लीटर तेलजन्य आणि अति ज्वलनशील पदार्थांचे साठवणूक केंद्र ही याच परिसरात आहे. त्यामुळे उरण हे संवेदनशील म्हणून त्याची ओळख आहे. याच परिसरात भूखंपाचे केंद्र निर्माण झाले आहे. उरणच्या नवगर परिसरात रविवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी दिली आहे.