उरण : खाडीची बंदिस्ती फुटल्याने शेतीत समुद्राचे पाणी शिरून नापिकी झालेल्या शेतीची कष्टाने मशागत करून दहा वर्षाने पुन्हा पिकाने फुलणार आहेत. शेतकरी कितीही संकटे आली तरी डगमगत नाही हे उरणच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. मागील दहा वर्षांपासून नापिकी झालेल्या जमिनीवर यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पिक घेण्याचा चंग केळवणे, पुनाडे आणि वशेणीच्या शेतकऱ्यांनी बांधला आहे. मागील दहा वर्षांपासून या परिसरातील सुमारे साडे तीन हजार एकर शेतीत समुद्राचे खारे पाणी शिरल्याने नापिकी झाली होती. खारफुटी शिवाय कोणतेही झाड या परिसरात उगवत नव्हते.  मात्र यावर्षी येथिल शेतकऱ्यांनी ही नापिक झालेली शेती साफ करून पुन्हा एकदा पिकासाठी मशागत केली आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय बंदर मंत्र्यांना जेएनपीए कामगारांचे साकडे; बंदरातील कामगारांना न्याय देण्याची मागणी

पनवेल व उरण तालुक्यातील केळवणे,पुनाडे या ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बंधाऱ्याला उधाणाच्या पाण्यामुळे बंदिस्तीला खांड गेल्याने गेली आठ-दहा वर्षे या परिसरातील भातशेती पिकत नव्हती.  २०१८ साली तात्कालिन मंत्री शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नानंतर ही फुटलेली खारबंधिस्ती दुरूस्ती झाल्यानंतर दहा वर्षानंतर शेतकऱ्यानी नापिकी झालेली आपली शेती पिकती करण्यास सूरूवात केली आहे. पुन्हा खाडीचे पाणी शेतात येवू नये म्हणून शेताची बांध बंधिस्तीची काम केली. ट्रॅक्टर फिरवून शेतीतील गवत आणि झाडे झुडपे काढली. यासाठी येथिल शेतकऱ्यानी कठोर मेहनत आणि लाखो रूपये खर्च केले. आठ-दहा वर्षात या शेतीतून एका रूपयाचे उत्पन्न किंवा शासनाची कोणतीही अनुदान न घेता सुद्धा येथिल जिद्दी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पुन्हा उभारी दिली आहे. आणि यावर्षी दुप्पट पिक घेण्यासाठी जोमाने मेहनत करण्यास सुरूवात केली आहे.