उरण : जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ साली उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ३.५ एमएमएससीएमडी गॅसची आवश्यकता आहे. मात्र सुरुवातीपासूनच केवळ १.०५ ते २.५ एमएमएससीएमडी इतकाच गॅसचा पुरवठा होत आहे. मागील काही वर्षांपासून आवश्यकतेनुसार गॅसपुरवठा होत नसल्याने सहापैकी तीन संच बंद पडले आहेत. त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पातून आता दररोज २५० ते ३०० मेगावॉट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.
६७२ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी ३.५ एमएमएससीएमडी गॅसचा पुरवठा झाल्यास उरण वायू विद्युत केंद्रातून दररोज ६५० मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकते, अशी माहिती महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी दिली. उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार-पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मात्र प्रस्तावित प्रकल्पाला गॅसपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. यामुळे प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, अशी माहिती महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी दिली.
या प्रकल्पाला पुरेसा वायुपुरवठा आणि विस्तार करण्याच्या वारंवार घोषणा करण्यात आल्या. आतापर्यंत अनेक ऊर्जामंत्र्यांनी येऊन प्रकल्पवाढीची घोषणा केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही.उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार-पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मात्र प्रस्तावित प्रकल्पाला गॅसपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. यामुळे प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही, अशी माहितीही महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
राज्यातील दररोजच्या विजेची मागणी २८१७९ मेगावॉट इतकी आहे.राज्याच्या २८१७९ मेगावॉट इतक्या विजेच्या मागणीपैकी महाजनकोकडून ७ हजार ८५८ मेगावाॅट यामध्ये उरण वायू विद्युत केंद्रातून २७० मेगावाॅट अन्य शासकीय आऊटसोर्सिंगकडून ३३६ मेगावॉट इतका वीजपुरवठा केला जात आहे. ऑक्टोबरपासून उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी ३० हजार मेगावॉटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र उरणच्या अस्तित्वात असलेल्या वायू विद्युत केंद्राला पुरेसा वायुपुरवठा केल्यास तसेच याच प्रकल्पातील प्रस्तावित ८५० मेगावाॅटचा प्रकल्प सुरू झाल्यास राज्यातील वीज तूट भरण्यास मदत होऊ शकते.
