उरण : शेतीच्या आतबट्याचा व्यवसाय फायद्याचा करण्यासाठी पुन्हा एकदा सामूहिक शेतीचा प्रयत्न करण्यात येत आहेत.शेतकरी गटाच्या माध्यमातून सामूहिक नियोजन, सामूहिक खरेदी, यंत्रसामग्रीचा सामूहिक वापर, ज्ञानाची देवाणघेवाण, उत्पादनाचे एकत्रित व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी सामूहिक जोडणी केल्यास शेतीतील खर्च कमी करून उत्पन्नाच्या संधीत वाढ करता येते. यासाठी माझा गट, माझं कुटुंब’ या संकल्पनेतून गटातील प्रत्येक सदस्याने केवळ स्वतःच्या शेताचा विचार न करता संपूर्ण गटाच्या प्रगतीचा विचार करावा, गटातील प्रत्येक सदस्याच्या अडचणीत एकमेकांनी साथ द्यावी आणि सामूहिक प्रयत्नातून गटाची आर्थिक प्रगती साधावी, असा संदेश
या प्रशिक्षणाला भेट देण्यासाठी आलेल्या पाणी फाउंडेशनच्या राज्य समन्वयक देशमुख आणि रायगड जिल्हा समन्वयक प्रणय गोरीवाले यांनी दिला.

सत्यमेव जयते फार्मर्स कप २०२६ अंतर्गत पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद अभियान यांच्या वतीने उरण तालुक्यातील शेतकरी गटांसाठी ‘माझा गट, माझं कुटुंब’ या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन चिरनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि.२०) करण्यात आले होते. या प्रशिक्षणात उरण तालुक्यातील विविध शेतकरी गटांमधील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या प्रशिक्षणातएकट्याने शेती करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत असताना, गटाने शेती करणे हे समृद्धीकडे जाण्याचे पायाभूत पाऊल ठरू शकते, या मुख्य विचारावर प्रशिक्षणाची मांडणी करण्यात आली. एकट्या शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या मजूर, यंत्रसामग्री, निविष्ठा, भांडवल, तंत्रज्ञान, उत्पादन विक्री आणि बाजारपेठेच्या अडचणींबाबत या प्रशिक्षणाद्वारे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी प्रशिक्षणाची पाहणी करून शेतकरी गटांशी उत्स्फूर्त संवाद साधून, गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सामूहिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील अनुभव व अडचणी मांडल्या. ‘एकट्याने शेती करण्यापेक्षा एकत्र येऊन शेती केल्यास आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये करता येते’, हा विचार प्रशिक्षणातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

सत्यमेव जयते फार्मर्स कप २०२६ च्या माध्यमातून उरण तालुक्यातील शेतकरी गटांना अधिक सक्षम, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या दिशेने ‘माझा गट, माझं कुटुंब’ प्रशिक्षण महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी शुभम गटकळ, उप कृषी अधिकारी अलका बरकुल, कृषी सहाय्यक अधिकारी अधिक पानसरे, कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड, कृषी सहाय्यक अधिकारी विभावरी चव्हाण, कृषी सहाय्यक अधिकारी सुरज घरत, बी टी एम नमिता वाकळे यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

सामूहिक शेती : उरण मध्ये ३० – ४० वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारचा मजूर न वापरता शेतकरी कुटुंब एकमेकांच्या शेतीवर काम करीत होते. त्यामुळे खर्च कमी होत होता. मात्र सध्या शेतीसाठी मजुरीसह बी बियाण्यांचा वाढता खर्च यामुळे शेतीती तोट्यात आहे. त्यामुळे तरुण पिढी शेती पासून दूर जात आहे.