उरण : शनिवारी (दि.४) सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण शहर आणि तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले आहे. समुद्राची भरती आणि पावसाचे पाणी यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात चिरनेर गावाला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला असून, नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून संसार उपयोगी सामानाबरोबर चीज वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
उरण शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचले होते. यावेळी उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी शहरातील गुडघाभर पाण्यात उतरून नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करून प्रशासनाला कामाला लावले. तर चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या गोदामांच्या बांधकामामुळे व नव्याने सुरू असलेल्या मातीच्या भरावांच्या कामांमुळे पावसाचे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चिरनेर गावावर पुराचे संकट ओढावले आहे. येथील शेतजमीनी देखील पाण्याखाली आल्या असून, पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे शेतीजमिनी पाण्याखाली आल्या आहेत.
पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांची भात शेती पूर्णता पाण्याखाली आली असून, शेतकऱ्यांनी आताच टाकलेले भाताचे बियाणे गेले चार दिवस पुराच्या पाण्यात बुडून गेले आहे. नवीन मातीचे भराव आणि गोदामामुळे पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा येत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून चिरनेर गावात वर्षानुवर्ष पावसाचे पाणी नैसर्गिक ओढे नाल्यांमधून कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहत होते. मात्र अलीकडे चिरनेर परिसरात गोदामांचे जाळे विणल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. गोदामांचे भराव उंचवताना पाण्याच्या प्रवाहाचा कोणताही तांत्रिक विचार केला गेलेला नाही.
निचाऱ्यासाठी आवश्यक पाईप किंवा जल वाहिन्या न टाकल्याने पावसाचे पुराचे पाणी आडले जात आहे. संपूर्ण पाण्याचा प्रवाह गावासह भात शेतीकडे वळला आहे. त्यामुळे गावासह शेत जमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाली असून आर्थिक संकटात सापडले आहेत. विकासाच्या नावाखाली जर गावे पुराच्या पाण्याखाली येत असतील, तर असा विकास काय कामाचा. असा सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे. याला संबंधित प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिरनेर गावावर ओढवलेले संकट असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान शनिवारी सकाळपासून जोर धरलेल्या पावसात चिरनेर गावातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. वाऱ्यासह शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची झोपच उडाली. आणि चिरनेर गावात हाहाकार उडाला. दरम्यान कळंबुसरे, मोठीजुई, विंधणे, दिघोडे, वेश्वी पाले आदी गावांनाही पुराचा फटका बसला आहे. तर कातळपाडा, मधीलपाडा, रांजणपाडा चिंचपाडा, मुळपाडा, कुंभारपाडा येथे रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. कातळपाडा हद्दीत येणारी माथेरान ही नवीन वसाहत देखील जलमय होऊन, येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून घरांची तळी झाली आहेत.
चिरनेर गावात पूर परस्थिती उद्भवली आहे . वेअर हाऊस, मातीचे भराव, नैसर्गिक नाल्यांवरची अतिक्रमणे यामुळे नैसर्गिक नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नसल्यामुळे चिरनेर गावाला पुराच्या पाण्याच फटका बसत आहे. असे मत येथील नागरीकांनी व्यक्त केले आहे.
मुसळधारेने उरणकारांना दिलासा : या जोरदार पावसामुळे उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई दोन दिवसात धरणाणे जवळपास २२ फुटांची अधिकची उंची गाठल्याने धरणाची पातळी १०० फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे एमआयडीसीने रविवारची पाणी कपात रद्द केली आहे.
