उरण : अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या भाताच्या पेरण्यांची उगवणच झालेली नाही. तर दुसरीकडे शेतात पाणी साचून राहिल्याने आलेली पिके कुजू लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट कोसळले आहे. वरूण राजावर भरवसा ठेवून शेती करणारा शेतकरी धास्तावला आहे. निसर्गाशी नाते सांगणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाने चांगलेच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे.

यावर्षी पावसाला जून महिन्याच्या अगदी अखेरीवर सुरुवात झाली. अधीच उशीर झालेला पाऊस जून महिन्याच्या अखेरीवर पेरणी करण्याच्या योग्यतेचा बरसल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची भात पेरणी केली. त्यानंतर पावसाने तीन-चार दिवस दडी मारली होती. भाताची पेरणी केलेल्या राबांना यावेळी पावसाच्या पाण्याची आवश्यकता होती. मात्र भातरोपांच्या उगवणीसाठी दमदार पावसाची गरज नसताना गेले तीन-चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने भात खाचरे पाण्याने भरून गेली. हे पाणी गेले चार-पाच दिवस शेतात कायम साचून राहिल्यामुळे भाताचे राब अक्षरशः कुजून गेले आहेत.

कुठेही एका काडीचीही उगवण न होता भाताचे राब पावसाचा वेग वाढतच राहिल्यामुळे भातरोपे तयार न होताच भात कुजून गेले. महागडी बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केली होती. ही बियाणे शेतकऱ्यांनी भातरोपे तयार करण्यासाठी वापरली. मात्र बियाण्यांचे भातच शेतात कुजून गेल्याने, निसर्गाशी नाते सांगणारा शेतकरी आता संकटात सापडला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आता भात बियाणे केंद्रावर सुद्धा भात बियाणे मिळत नसल्यामुळे तसेच घरातील उरल्या सुरल्या भात बियाण्यांचा देखील शेतकऱ्यांनी वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याच्या भाताची पंचायत झाली आहे.

विशेषत: धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने या भात बियाणाला उगविण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामातील भात पेरणीला यावर्षी जून महिन्यात खरी सुरुवात करता आली नाही.

दरवर्षी मृग नक्षत्रात शेतकरी पेरणी करतात. मात्र पाऊस उशिरा बरसला. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या. महागडी बियाणे खरेदी करून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र भाताची उगवण व्यवस्थित रित्या न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. अति पावसामुळे भात शेतीची खाचरे भरून गेल्याने रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला असून काही ठिकाणी कोचीतच उगवलेली रोपे फार कमकुवत असल्याचे कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी सांगितले.

महागडी बियाणे, वाढत्या मजुरीचे दर आणि भातरोपे कुजून गेल्यामुळे बहुतांशी शेतकरी यंदा भात शेती ओसाड ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. उरण तालुका हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे. परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तालुक्यातील भात लागवड क्षेत्र कमी झाले आहे. उरण तालुक्यात आजही पारंपारिक पद्धतीने भातशेती केली जाते. मात्र पावसामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील भात पेरणी हवी तशी न झाल्यामुळे भातरोपे उगवलीच नाही. धूळपेरणीला संधी न मिळाल्यामुळे जी उन्हाची उब महत्त्वाची आहे. ती उब शेतात साचलेल्या पाण्यामुळे मिळाली नाही. त्यामुळे भात रोपांची अवस्था फार बिकट झाली आहे.

“उरणमधील अतिवृष्टीचा भात पिकांवर परिणाम झाला असून पेरणी केलेल्या पैकी ५० टक्के पीके कुजली आहेत. मात्र पुढील काही दिवस पावसाने उसंत घेतल्यास किमान २५ टक्के पीक तरी मिळण्याची आशा आहे”, असे मत रायगड जिल्ह्यातील शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.