उरण : निधी नसल्यामुळे उरणमधील आठ गावांतील जलजीवन योजना थांबली आहे. याचा फटका येथील २५ हजार कुटुंबांना बसला. पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आणि जुन्या गळक्या जलवाहिन्यांमुळे उरण तालुक्यातील आठ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

उरण पूर्व विभागातील पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कडापे या गावांतील नागरिकांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाच्या जुन्या, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या सातत्याने फुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तसेच आधीच गळती लागलेल्या पुनाडे धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील रहिवाशांना करण्यात येत असलेला पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

या आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने २०२२ साली ११ कोटींची जनजीवन योजना मंजूर करून घेतली होती. यामध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, ८ इंच व्यासाची नवीन जलवाहिनी टाकणे अशा कामांचा समावेश होता. २०२४ पर्यंत या जनजीवन योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र मे महिना उजाडल्यानंतरही सर्वच कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यानेच निधीच्या कमतरतेमुळे जनजीवन योजना मागील चार वर्षांपासून रखडलेली आहे. निधीअभावी रखडलेली ११ कोटींची जनजीवन योजना, शासनाची विविध प्रकारची अर्धवट राहिलेली कामे, जुन्या गळक्या जलवाहिन्या आणि पुनाडे धरणाने तळ गाठल्याने उरण तालुक्यातील आठ गावांतील २५ हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची माहिती सरपंच व पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना समितीच्या सदस्या अनामिका म्हात्रे यांनी दिली.

जनजीवन योजनेअंतर्गत येणारी कामे सुरू करण्यासाठी निधी नसल्याने पुनाडे पाणीपुरवठा योजनेचे काम थांबले आहे. या योजनेच्या खर्चासाठी अतिरिक्त आणखी एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. पुनाडे पाणीपुरवठा योजनेतून आतापर्यंत नवीन तसेच दुरुस्तीची ७८ टक्के कामे झाली आहेत. योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली होती.

  • प्रशांत पांढरपट्टे, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण