उरण : मासेमारी बंदीच्या कालावधीत मच्छीमार ४०० ते ५०० फुटांच्या महाकाय जाळीच्या दुरुस्तीचे (शिवण्याचे) काम करतात. या कामात आंध्रप्रदेशातील करागिर अधिक प्रवीण मानले जात असल्याने मच्छीमार त्यांना बोलावतात. दरवर्षी ४०० पेक्षा अधिक कारागिर उरणमध्ये येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर २०० फुटांपेक्षा लांब व पन्नास ते साठ फूट रुंद अशी जाळी वापरली जाते. मासळी पकडताना ही जाळी अनेकदा फाटते. त्याला ठिगळ बसवावे लागते. मासेमारी बंदीच्या काळात ही जाळी दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येते. महाकाय अशा या जाळीची दुरुस्ती करणे हे जिकरीचे काम आहे. मशीनच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली ही जाळी शिवण्याचे कौशल्य हे आंध्रप्रदेश मधील कारागिरांना आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम त्यांच्याकडून केले जात आहे. हे कारागिर मे महिन्यापासूनच करंजा बंदरात दाखल होतात. ते गणेशोत्सवापर्यंत काम पूर्ण करून आपल्या राज्यात परततात, अशी माहिती करंजा येथील मच्छीमार नेते निशिकांत नाखवा यांनी दिली.
१८ कोटी रुपयांची उलाढाल
करंजा बंदर परिसरात जाळी विण्यासाठी येणारे कारागिर तासाला ११० रुपये घेतात. या काळात ३०० बोटींवरील जाळी शिवली जाते. एक बोटीमागे ६ लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे या बंदरात तब्बल १८ कोटींची आर्थिक उलाढाल होते, अशी माहिती करंजा बंदर मच्छीमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी दिली.
आंध्रप्रदेश मधील तिरकापूरम या किनारपट्टीभागातून दरवर्षी करंजा बंदरात मासेमारी जाळी विणण्याचे काम करण्यासाठी येतो. राहण्याची व्यवस्था बोट मालक करतात. या काळात चांगली मजुरी मिळते म्हणून या भागात येतो. – रामा गोडा कल्ली, कारागिर
