उरण : शनिवारी १५ऑगस्ट पासून खोल समुद्रातील मासेमारी राज्य सरकारने घातलेली बंदी उठल्याने नवा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे करंजा,मोरा बंदरासह इतर छोट्या बंदरातही मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. यात बोटींची डागडुजी,रंग रंगोटी,बोटींवर जाळी चढवण्याची कामे वेगाने सुरू आहेत. यावर्षी तब्बल अडीच महिन्याच्या विश्रांती नंतर हे बंदर सुरू झाले आहे. त्यामुळे बंदरावर वर्दळही वाढली आहे.
हंगामाची तयारी सुरू असली तरी येथील मच्छिमाराना सरकार कडून मिळणाऱ्या तेल( डिझेल ) कोट्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हजारो मच्छिमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा कोटा सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी मच्छिमारांनी शासनाकडे केली आहे.मासेमारी करणाऱ्यांना शासनाकडून मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींना वर्षाकाठी ३५ हजार लिटर डिझेल दिले जाते. या डिझेलवर शासनाकडून डिझेल वरील वॅट किंवा लिटर मागे १८ रुपयांची सूट दिली जात आहे. यालाच मच्छिमार डिझेल परतावा असे म्हणतात. हे तेलावरील अनुदान शासनाच्या मत्स्यविभागाने त्याचा कोटा मंजूर केल्या शिवाय मिळत नाही. मच्छिमारांना या कोट्याविना मासेमारी करावी लागत आहे. तर मागील काही महिन्याचे डिझेल वरील परतावे ही थकले आहेत. याचा परिणाम मासेमारीच्या नव्या हंगामावर झाला आहे.
शासनाने पावसाळ्यात दोन घातलेली खोल समुद्रातील मासेमारी बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट पासून मासेमारी सुरू होणार आहे. मात्र नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत झाल्याने मासेमारी जोर येणार आहे. गेल्या वर्षा पासून १५ ऑगस्ट पासून मुंबईतील ससून डॉक ऐवजी उरणच्या करंजा बंदरात सुरू झालेल्या मासळी बाजारामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होणार आहे. तर, स्वस्त दरात मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, कल्याण, अलिबाग, ठाणे येथील व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी हे करंजा बंदरात येतात.
उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. यामध्ये, सुमारे ७०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी असून मासळीची खरेदी- विक्री करण्यासाठी त्यांना मुंबईतील ससूनडॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ६०० मीटर लांबीचे ‘फिशिंग- डॉक’ करंजा येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये, मासेमारी बोटीतील मासळी बंदरात उतरवून त्याच्या खरेदीविक्रीला सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे, नव्याने सुरू झालेल्या ‘करंजा – द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर’ येथे अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी हे घाऊक आणि दैनंदिन गरजेसाठी आवश्यक मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
करंजा बंदरामुळे मुंबईच्या ससून बंदरावर परिणाम : उरणच्या करंजा व मोरा येथील शेकडो मच्छिमार बोटी अनेक वर्षे मुंबईतील ससून बंदरात मासळी विक्री करीत होते. मात्र सध्या या बोटी नव्या करंजा बंदरात मासळीचा व्यापार करीत आहेत. त्यामुळे ससून बंदराच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मासळी निर्यातीला वेग : गेल्या अडीच महिन्यापासून मासेमारी बंदी होती. त्यामुळे करंजा बंदरातील मासळी खरेदी विक्रीचा घाऊक बाजार बंद होता. तो नव्याने पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या बंदरातून मागील वर्षी ६५० कोटींहून अधिकच्या मासळीची खरेदी विक्री झाली होती.
