उरण : समुद्रकिनाऱ्यावरील शेतीचे भरतीपासून संरक्षण करणारी घातलेले बांध कमकुवत झाले आहेत. या नादुरुस्त बांधाना भेगा जाऊन समुद्राचे खारेपाणी भात शेतीत शिरू लागले आहे. याकडे शासनाच्या खारलँड विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जमिनी नापिकी होण्याचा धोका वाढला आहे. तर या जमिनीवर खारफुटी वाढू लागल्याने शेती हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

उरण तालुक्यातील संरक्षण बांधालगतची हजारो हेक्टर जमीन धोक्यात आली आहे. या जमिनीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या पन्नास वर्षात उरण तालुक्यातील हजारो एकर जमिनी केंद्र व राज्य सरकारच्या औद्योगिक प्रकल्प, बंदर आणि खासगी उद्योगासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरणमधील शेतजमिनी कमी झाल्या आहेत.

असे असले तरी उरणच्या नागाव, केगाव व चाणजे तसेच उरण पूर्व विभागातील खोपटे, कोप्रोली, चिरनरे, आवरे, गोवठाणे, वशेणी, पुनाडे, धुतुम, बोरखार, मोठीजुई आदी खाडी किनारी भातशेती आहे. मात्र या जमिनीवर समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या नैसर्गिक वाटा बुजविण्यात येत आहेत.

त्यामुळे शेतीच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले बांध नादुरुस्त होऊन भात शेतीत पाणी शिरू लागले आहे. खारलँड विभागाने लक्ष देण्याची मागणी येथे खारफुटी उगवू लागल्याने याचा फायदा घेत अगदी कवडीमोल दरात या जमिनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जात आहेत. यात खोपटे, मोठीजुई, बोरखार परिसरातील शेतीत पाणी शिरून शेतीचे नुकसान होत आहे.

या जमिनीचे समुद्राच्या भरतीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी खारलँड विभागाची आहे. उरण तालुका हा खारलँड विभागाच्या पेण परिक्षेत्रात मोडतो. संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देत उपाययोजना करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.

कोट

उरण हे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होते. मात्र औद्योगिकीकरणामुळे शेतीचे प्रमाण घटले आहे. त्यात शिल्लक जमिनीवर खारलँड विभागाच्या दुर्लक्षामुळे समुद्राचे पाणी शिरत आहे, या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी खारलँड आणि मेरिटाइम बोर्डाकडे पाठपुरावा केला आहे. -सत्यवान भगत, शेतकरी कार्यकर्ते, खोपटे