उरण : गणेशोत्सवासाठी उरणमार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाट्याला याहीवर्षी खड्ड्यांचे विघ्न आहे. कोकणाचा मुख्य मार्ग असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच खोपटे पुलावरही खड्डे आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील अनेक नागरिक कोकणात जाण्यासाठी उरण तालुक्यातील गव्हाणफाटा-चिरनेर-खारपाडा या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे ८ ते १० किलोमीटरचे अंतर वाचते. यातील काही मार्ग सुस्थितीत असले तरी बहुतांशी मार्गावर खड्डे आणि जोडीला अनधिकृत पार्किंगमुळे होत असलेली वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
चिरनेर-गव्हाणफाटा-दिघोडे या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात यात भर पडणार आहे. उरण तालुक्यातील बहूसंख्य मार्ग प्रशस्त असले तरी सिडकोच्या ताब्यातील कोस्टल रोड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील खोपटे-कोप्रोली रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याचा फटका गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांना बसण्याची शक्यता आहे. तसेच चिरनेर-खारपाडा रस्त्यावर साई गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. प्रशासनाने या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
उरण मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोंडी होणार नाही.- संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक विभाग
