उरण : पावसाचे आगमन यंदा उशीरा झाल्याने नागरिकांना नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची प्रतीक्षा होती. गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने रानभाज्या आणि कंद लवकरच बाजारात विक्रीसाठी आले होते. मात्र या वर्षी जून महिन्याची अखेर येऊनही पावसाच्या अभावामुळे रानभाज्या आलेल्या नव्हत्या. मात्र गेले काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने रानभाज्या उगवत आहेत.
डोंगराळ आणि जंगलाने वेढलेल्या उरण तालुक्यातील गावांमध्ये अनेक दुर्मीळ आणि औषधी वनस्पती, फळे आणि रानभाज्या आढळतात. पावसाला सुरूवात होताच या भागातील आदिवासी जंगल, डोंगर आणि माळरानात आढळणारे करांदे, हळदे यासारखे कंद गोळा करून त्याची पनवेल, उरण येथील बाजारांत विक्री करू लागले आहेत.
यामुळे त्यांना रोजगार मिळत आहे. विशेष करून शेवळा, टाकळा, कंटोळी, कोरळा, कुर्डू यांसारख्या रानभाज्यांनी या भागातील बाजारपेठा भरून जात आहेत. चिरनेर, वेश्वी, रानसई, कोप्रोली, आवरे, पुनाडे, सारडे तसेच उरणजवळील द्रोणागिरी डोंगरात अशा प्रकारच्या भाज्या आणि कंद मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. दरवर्षी पावसाळ्यातच या रानभाज्या मिळत असल्याने खवय्येही या भाज्यांची खरेदी करत आहेत.
डोंगर पोखरल्याने परिणाम
उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरावाची कामे सुरू आहेत. त्यासाठी या भागातील डोंगर आणि माळराने पोखरली जात आहेत. त्यामुळे कंद, रानभाज्या मिळणे अवघड होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वी एक दोन तासांत गोळा करता येणाऱ्या रानभाज्यांना आता पूर्ण दिवस लागत असल्याची खंत या भागातील आदिवासी व्यक्त करत आहेत.
२५ रुपयांना जुडी
कोणतेही खत आणि कीटकनाशकांच्या वापराशिवाय मिळणाऱ्या या रामभाज्या २५ रुपये जुडी या भावाने विकली जात आहे. यामध्ये कुलू, अंबाडी, शेवळ, टाकला, भारंगी, कंटोळी अशा रानभाज्यांचा समावेश आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
