उरण : मोरा या प्रवासी जेट्टीची दुरवस्था झाली आहे. जेट्टीला जोडणाऱ्या मार्गावरील लाद्या आणि कठडे तुटलेले असून त्यांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र मोरा जेट्टीची पूर्ण दुरुस्ती होण्यासाठी जुलै २०२७ उजाडणार आहे. यामुळे येथील प्रवाशांना अजून वर्षभर येथील समस्यांचा सामना करावा लागणार आहे.मोरा जेट्टीवर जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील लाद्या उखडल्या असून प्रवाशांना खड्ड्यांतून ये-जा करावी लागत आहे. या मार्गाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कठडेही तुटलेले आहेत. याच कठड्यांवर दोन्ही बाजूला मासेमारी जाळी ठेवण्यात येत असल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. तसेच या जाळ्यांत प्रवाशांचा पाय अडकून पडण्याची शक्यता वाढली आहे. जेट्टीवर ये-जा करण्यासाठी असलेल्या मार्गावरील पथदिवेही नादुरुस्त असल्याने संध्याकाळी येथे अंधार पसरतो.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून नादुरुस्त मोरा जेट्टीच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील शेकडो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मात्र ही दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी केली आहेमोरा-मुंबई जलप्रवासासाठी येथे यावे लागते. सध्या या जेट्टीवरून चालणे धोकादायक आहे. त्यामुळे या जेट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करावे. – संग्राम कोळी, प्रवासी

मोरा जेट्टीच्या मजबुतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम निविदेनुसार २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मोरा जेट्टी पूर्ण नवी करण्यात येणार आहे. मात्र हे केवळ जेट्टीच्या मजबुतीकरणाचे काम नसून जेट्टीवरील मार्ग, वीज आदी कामे करण्यात येणार आहेत.- अजय यादव, अभियंता, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड