उरण : उरणमध्ये नागरी सुविधांवरून राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. नगर परिषदेची चौथी सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. या सभेत नगराध्यक्षपद असलेल्या महाविकास आघाडीने मांडलेले १३ ठराव बहुमत असलेल्या भाजपच्या गटाने विरोध करीत नामंजूर केले. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विलंब होत असल्याचा दावा नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी केला आहे.

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच निधीचा अभाव असल्याचे कारण देत विकासकामांना विरोध केल्याने पावसाळपूर्व अत्यावश्यक कामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उरण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी शांततेत पार पडली; मात्र या सभेत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विरोधी बाकावर असलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या नागरी सुविधांशी संबंधित ठरावांना विरोध दर्शवत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. परिणामी, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामे पुन्हा एकदा राजकारणाच्या कचाट्यात अडकली असल्याचे चित्र निर्माण झाले.

सर्वसाधारण सभेत रुग्णालय व विद्यालये असलेला मार्ग सुरक्षित करणे, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरविणे, बोरी स्मशानभूमीत सुविधा निर्माण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडर सभागृहाची देखभाल, नगर परिषदेच्या बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती यासह अनेक कामांचे ठराव नामंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी निधीचा अभाव असल्याचे कारण दिले. सभेमध्ये प्रत्येक ठरावावर मतदान घेतले असता १० विरुद्ध १२ अशा मतांनी हे ठराव नामंजूर करण्यात आले. दरम्यान यातील अनेक कामे नागरिकांच्या सुरक्षेशी आणि आरोग्याशी थेट संबंधित असतानाही त्यांना विरोध झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीनंतरही राजकीय तणाव

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्याच वेळी महाविकास आघाडीचे नऊ, तर भाजपचे १२ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे नगराध्यक्षपद गमावूनही भाजपाकडे बहुमत टिकून राहिले. याच बहुमताच्या जोरावर सभागृहातील निर्णय प्रक्रियेत भाजपचा प्रभाव कायम आहे.

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष?

सभेत राजकीय भूमिका ठामपणे मांडताना विरोधकांनी निधीचा अभाव असल्याचा मुद्दा पुढे केला असला, तरी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर परिणाम होणाऱ्या कामांना विरोध केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ येत असताना ही कामे रखडल्यास नागरी समस्या, आरोग्याच्या समस्या आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

विरोधकांनी राजकारण करणे स्वाभाविक आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आणि लढणार.- भावना घाणेकर, नगराध्यक्ष, उरण नगरपरिषद

आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्या ठरावांना विरोध आहे. त्यांनी बहुमत सिद्ध करावे तसेच कामांसाठी लागणारा निधी आणावा.- रवी भोईर, उपनगराध्यक्ष, उरण नगर परिषद