शहरबात- उरण : सत्तांतर की पुन्हा सत्ताधारी?

मागील निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना तसेच भाजप यांची महायुती होती.

येत्या २३ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती पडल्या ते स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची निश्चिती करण्यात गुंतले आहेत. तर इच्छुकांनी उमेदवारीसाठी श्रेष्ठीचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे; मात्र युती आणि आघाडीची दिशा स्पष्ट न झाल्याने जिल्हा आणि तालुकास्तरीय नेतेही संभ्रमात आहेत. निवडणुकीत उरणमध्ये शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस या प्रस्थापितांची निवडणुकीत अस्तित्वाची लढाई असेल, तर भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.

[jwplayer k7pRwlU6]

नवी मुंबईचाच भाग म्हणून औद्योगिकदृष्टय़ा आणि नागरीकरणामुळे निमशहरी बनू लागलेल्या उरण तालुक्यात तसेच पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून होणाऱ्या विकासाचे महत्त्व कमी झाले आहे. असे असले तरी रायगड जिल्हा परिषदेच्या नव्या फेररचनेमुळे ६२ ऐवजी ५९ मतदारसंघ निर्माण झाले आहेत. रायगडमधील पनवेल ग्रामीण भाग महानगरपालिकेत गेल्याने हा बदल घडला आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागा आणि पंचायत समितीच्या आठ जागा कायम राहिल्या आहेत. २०१२ ला झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी दोन जागा काँग्रेसकडे तर शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी एक जागा होती. या निवडणुकीत शेकापला आपले खातेही उघडता आले नव्हते. तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी सर्वाधिक शिवसेनेकडे चार तर, शेकाप दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ होते. यातील राष्ट्रवादीच्या पंचायत सदस्याने शिवसेनेत तर नुकताच काँग्रेसच्या सदस्याने भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या दोन्ही पक्षांचा एकही सदस्य नाही.

मागील निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना तसेच भाजप यांची महायुती होती. तर काँग्रेसकडे माजी खासदार रामशेठ ठाकूर होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. तर भाजपने रायगड जिल्ह्य़ात प्रथमच २०१२ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची उरणमधील निवडणूक लढवीत सर्व पक्षांना आश्चर्याचा धक्का देत विजय संपादित केला होता. त्यामुळे या वेळी शिवसेना आणि भाजप युती व्हावी अशी इच्छा भाजपकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी चर्चेच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांचे समान वाटप करण्याची मागणी केली जात आहे; मात्र उरण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेकडे असल्याने आणि सध्या उरण पंचायत समितीत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने किमान एक तरी जागा भाजपपेक्षा अधिकची हवीच, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. त्यामुळे चर्चेत अडथळा निर्माण झाला आहे.

असे असले तरी ही युती झाल्यास शिवसेना व भाजपला उरण तालुक्यात विरोधकांशी चांगली लढत देता येण्यासारखे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्योत्तर काळापासूनच उरण तालुक्यात शेकापची एकहाती सत्ता होती. ती टिकविण्यासाठी १९९० नंतर शिवसेनेशी युती करावी लागली. सध्या शिवसेना व भाजप यांच्याशी उरण तालुक्यात पटत नसल्याने शेकापने समविचारी पक्ष म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादीला आपलेसे केले आहे. याची सुरुवात त्यांनी उरण नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या तीन्ही पक्षांची आघाडी करून निवडणुका लढत केली आहे. २०१२ च्या स्थितीनुसार तालुक्यात जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला होता. त्यामुळे सध्या काँग्रेसची ताकद घटली असली तरी त्यांचा दावा जिल्हा परिषदेच्या चार पैकी दोन जागांसाठी आहे. त्यामुळे शेकाप काँग्रेसच्या आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. मात्र यातून मार्ग निघून आघाडी होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. रायगड जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या सत्तेत अनेक वर्षे शेकापक्ष या ना त्या मार्गाने आहे. सुरुवातीला स्वबळावर तर, त्यानंतर शिवसेनेच्या युतीत. त्याचप्रमाणे सध्या राष्ट्रवादीशी घरोबा करीत शेकाप सत्तेत आहे. याचा फायदा जिल्ह्य़ाची सत्ता उपभोगणार पक्ष म्हणून शेकापची ओळख कायम आहे. या निवडणूकीतही जिल्हयात राष्ट्रवादीशी आघाडी करून शेकाप सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर अनेक ठिकाणी काँग्रेस व शेकाप एकमेकांविरोधात आहेत. त्यामुळे शिवसेना व काँग्रेसही एकत्र येत निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगरपालिकेत ताकद आजमाविल्यानंतर भाजपने आता कंबर कसली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत पनवेल व उरण या दोन तालुक्यांतून जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणण्यासाठी भाजप कामाला लागले आहे.

या वेळी जिल्ह्य़ातील भाजपची ताकद या दोन तालुक्यांतून वाढण्याची शक्यता आहे. मिनी विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या यानिवडणुकीत सर्वपक्षियांचे अस्तित्व पणाला लागले आहे. यात अनेक वर्षे जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी असलेल्या शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी टक्कर देत भाजप पुढे येईल की पुन्हा एकदा अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांच्या हाती सत्ता येईल ते स्पष्ट होणार आहे.

[jwplayer Iz0EPYRx]

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uran municipal council elections

ताज्या बातम्या