उरण : पेट्रोलियम ॲण्ड नॅचरल गॅस संसदीय समितीच्या ११ खासदारांनी उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी उरण प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या तेल- गॅस गळती, आग, स्फोटासारख्या घटना याबाबत कमिटीने चिंता व्यक्त करताना अशा प्रकारच्या गंभीर घटना प्रकल्पात भविष्यात घडणार नाहीत याची दक्षता घेऊनतातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाचा शुक्रवारी पेट्रोलियम ॲण्ड नॅचरल गॅस संसदीय स्टॅण्डिंग कमिटीने अभ्यास दौरा केला.कमिटीचे सभापती खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या दीड दोन तासांच्या अभ्यास दौऱ्यात ११ खासदार सहभागी झाले होते.कमिटीच्या ११ खासदारांनी प्रकल्पाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.यानंतर कमिटीने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे,उरण ओएनजीसी मुख्य प्रकल्प अधिकारी अरुण कुमार सिंह, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पेट्रोलियम क्षेत्रावर जागतिक भू-राजकीय परिस्थितीचा प्रभाव व इतर विविध विषयावर चर्चा केली.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात तेल- गॅस गळती, आग, स्फोटासारख्या घटना वारंवार घडत आहेत.वारंवार घडणाऱ्या या गंभीर घटनांबाबत कमिटीने चिंता व्यक्त केली.अशा प्रकारच्या गंभीर घटना प्रकल्पात भविष्यात घडणार नाहीत याची दक्षता घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही कमिटीने ओएनजीसी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे कमिटीचे सभापती खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.अन्य बाबींवरही चर्चा झाली.मात्र त्याचा तपशील उघड करता येत नसल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
यावेळी बैठकीच्या चर्चे दरम्यान नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परिक्षीत ठाकूर यांनीही कैफियत मांडली.परिसरात ओएनजीसीसारखा मोठा प्रकल्प कार्यरत आहे.मात्र या ओएनजीसी प्रकल्पात काही प्रमाणात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या.मात्र गरीब-गरजू उरणकरांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे एकही अद्यावत हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही.
त्यामुळे उरणकरांना उपचारासाठी मुंबई, नवीमुंबई, पनवेल सारख्या शहराकडे धाव घ्यावी लागते.उच्च शिक्षणासाठीही उरणकरांना मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागते.यासाठी ओएनजीसीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची बाब माजी सरपंच परिक्षीत ठाकूर यांनी पेट्रोलियम ॲण्ड नॅचरल गॅस संसदीय स्टॅण्डिंग कमिटीच्या खासदारांसमोर मांडली.मागण्यांचे निवेदनही दिले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या ससंदीय कमिटीच्या खासदारांच्या अभ्यास दौऱ्याची तपशीलवार माहिती देण्यासाठी मात्र ओएनजीसीचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.
