उरण : उरण पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण १२ जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी थेट लढती होणार आहेत. काही ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, अपक्ष आणि शिवसेना(शिंदे गट)यांचेही उमेदवार रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्जानुसार नवघर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाच्या प्रेरणा कुणाल पाटील व भाजपच्या प्रभावती राजाराम भोईर, जासईत काँग्रेसचे डॉ. मनीष पाटील व भाजपचे जे. डी. जोशी, चाणजेमध्ये भाजपच्या माजी सदस्या रीना जितेंद्र घरत व शिवसेना ठाकरे गटाच्या सिद्धी सागर कडू, चिरनेर गटात भाजपचे देवेंद्र विनायक पाटील व काँग्रेसचे अविनाश विजय ठाकूर यांच्यात लढत आहे. तर पंचायत गणात नवघरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे परेश ठाकूरविरोधात भाजपचे हरेश भोईर, भेंडखळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दीपक सुरेश भोईर, भाजपचे मिलिंद पाटील तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कुंदा भूषण पाटील यांच्यात लढत होणार आहे.
जासईत शेकापच्या निर्मला नरेश घरत व भाजपच्या मनीषा बळीराम घरत, चिर्ले गणात भाजपच्या जोत्स्ना अजित पाटील व शेकापच्या प्रियांका दीपक मढवी, केगावमध्ये शेकपचे महेश म्हात्रे व भाजपचे राजेंद्र ठाकूर, चाणजेमध्ये भाजपचे कैलास मोरेश्वर भोईर आणि शेकापचे माजी सभापती सागर सदानंद कडू तर चिरनेर गणातून शिवसेना ठाकरे गटाच्या कविता रुपेश पाटील व भाजपच्या साक्षी सुजित पाटील, आणि आवरे गणातून भाजपच्या समिधा निलेश गावंड विरोधात शेकपच्या प्रारंभी गावंड यांच्यात लढत आहे.
कम्युनिस्ट पक्षाची लोकवर्गणीतून निवडणूक
सत्ताधारी व विरोधकात मतांसाठी चढाओढ लागली आहे. मात्र जनतेसाठी लढणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मात्र जनतेसाठी जनतेच्या निधीतून म्हणजे लोकवर्गणीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उमेदवारांना आपले अमूल्य मत आणि निवडणूक फंडही द्यावा असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. तसे पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले असून या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे आणि कॉ. भूषण पाटील यांनी दिली आहे.

