उरण : बोकडवीरा पोलीस चौकी ते कोट नाका दरम्यानच्या १ हजार ६०० मीटर लांबीच्या उरण-पनवेल मार्गाचे रुंदीकरण पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहे, अशी माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. यासाठी ७ कोटींचा निधी खर्च होणार आहे.उरण-पनवेल मार्ग हा सध्या सात मीटर रुंद असून तो आता १४ मीटर रुंद होणार आहे. तसेच या मार्गावर दुभाजकही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली असून कामही सुरू झाले होते. मात्र पावसामुळे हे काम रखडले असून पावसाळा संपताच कामाला सुरुवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.
उरण ते नेरुळ/ बेलापूर लोकल आणि उरणच्या द्रोणागिरी परिसरात वाढणारी लोकवस्ती यामुळे उरण-पनवेल मार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग बनला आहे. या मार्गावरील वाढत्या वाहनांमुळे अपघातही वाढले आहेत. दुहेरी मार्ग असलेल्या या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यात पावसाळ्यात मार्गाच्या बाजूला झाडाझुडपांत वाढ होऊन तो अधिकच अरुंद होतो. त्यामुळे वाहन चालवणे जिकरीचे होते. उरण-पनवेल मार्ग दोन अस्थापनांत विभागला गेला आहे. यात नवघर ते बोकडवीरा पोलीस चौकी पर्यंतचा मार्ग सिडकोकडे तर कोटनाका ते पोलीस चौकी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
या मार्गाच्या रुंदीकरणामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या कोटनाका ते बोकडवीरा चौकी या १ हजार ६०० मीटर लांबीच्या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पावसाळा संपताच सुरू होणार असल्याची माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता डी.एम. पाटील यांनी दिली.
