उरण : हमरापूर परिसर हा गणपती मूर्तीसाठी जगभर प्रसिध्द आहे. मात्र या परिसरात पावसामुळे भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे चुकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याच मार्गावरून जगात गणेशमूर्तीची ने आण केली जाते. परिणामी मूर्तींना खड्ड्यांचा धोका निर्माण झाला आहे. येथील दादर, कळवे,जोहे, तांबडशेत ते हमरापूर या मार्गावर हे खड्डे पडले आहेत. या खड्ड्या संदर्भात काही तरूणांनी समाजमाध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणीही केली जात आहे. गणेशमूर्तीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या या गावांना जोडणारा मार्ग हा उरण आणि पेण पर्यंत जातो.

मुंबई,ठाणे,नवी मुंबई या परिसरातील बहुतांशी गणेशमूर्ती याच मार्गाने नेल्या जातात. तर या गावातील विद्यार्थी, नागरीकही याच मार्गाने प्रवास करीत आहेत. जून महिन्यात आलेल्या पुरात या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यातील खड्डे हे रस्ता भर आहेत. त्यामुळे खड्डे कोणते आणि रस्ता कोणता याचा थांगपत्ता लागत नाही. गणेशमूर्तीचे अनेक कारखाने हे या मुख्य मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे शोरूम ही आहेत. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. अवघ्या आठवडा भराने गणेशमूर्ती नेण्यासाठी शेकडो वाहन येणार आहेत. त्यावेळी या मार्गावर आधीच अरुंद मार्ग असल्याने खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी ही होण्याची शक्यता आहे. ज्या विभागाच गणेशमूर्तीसाठी जगभरात नाव झालं आहे. त्या परिसरातील मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हमरापूर परिसर हा गणपती साठी प्रसिध्द आहे. मात्र येथील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यातील खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून विद्यार्थी वाहनेही मोठ्या प्रमाणात ये जा करीत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवा पूर्वी हा मार्ग दुरुस्त करावा अशी मागणी जोहे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशिनाथ पाटील यांनी केली आहे. हमरापूर कळवे जोहे मार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. अशी माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता दामोदर पाटील यांनी दिली आहे.