उरण : शहरालगत असलेल्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर संरक्षण कठड्याच्या मोठमोठ्या दगडांचा खच पडल्याने पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यास अडचण होत आहे. तर बंधाऱ्याचे दगड कोसळत असल्याने तटबंदी ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेला उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. त्यातच उरण तालुक्याला लाभलेला पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी एकमेव किनारा आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान, उरणच्या या समुद्रकिनाऱ्याची धूप होत असल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी नागाव ते दांडा समुद्रकिनाऱ्यावर सुमारे १५ फूट उंचीचा दगडी बंधारा टाकण्यात आला.
साठी, कोट्यवधी रुपये खर्चून लहान-मोठ्या आकाराचे दगड एकमेकांवर रचून हा बंधारा बांधण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बंधाऱ्यावरील दगड खाली वाळूमध्ये कोसळल्याने किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना अडचण निर्माण झाली आहे. तर किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला खडक असल्याने त्या ठिकाणी खाली उतरून फिरणे शक्य नसल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.
पर्यटकांच्या समस्या
- पिरवाडीच्या या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जेट्टीजवळ मोठ्या प्रमाणात दगड असल्याने लहानग्यांना आणि ज्येष्ठांना समुद्रावर जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे पर्यटक निशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.
- किनाऱ्यावरील सुमारे १५० ते दोनशे फुटांच्या अंतरात वाळूवर आलेल्या दगडांमुळे लहानग्यांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही, तर वाळूत जाण्यासाठी या दगडांमधून मार्ग काढताना कसरत करावी लागत असून अपघात होण्याची भीती पर्यटक ज्योती म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
- किनाऱ्यावर वाळू कमी आणि दगड जास्त आहेत. बंधाराही निखळल्यास सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेता यावा यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना तर किनाऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी बंधाऱ्याची डागडुजी गरजेची असल्याचे पर्यटक जिग्नेश तांडेल यांनी सांगितले आहे.
कोट येणार आहे.
