उरण : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याने दरवर्षी पटसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पटसंख्ये अभावी शाळा ओस पडू लागल्याने जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. सध्या पालकाकडून इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले जात असल्यामुळे या शाळांमधून स्थानिक विद्यार्थी संख्या रोडावत आहे.
तालुक्यातील ५६ शाळांना काही प्रमाणात भेडसावणाऱ्या सोयीसुविधांबरोबरच दिवसेंदिवस शिक्षकांना विद्यार्थ्यांची होणाऱ्या गळतीचीच अधिक चिंता सतावत आहे. पाल्यांच्या भवितव्यासाठी इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांच्या आकर्षणामुळे पटसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पटसंख्या वाढविण्यांचे शासकीय यंत्रणेचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. शाळांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत आहे. उरणमधील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक आहेत तर पटसंख्या कमी आहे. पटसंख्या आहे तर शिक्षकांची संख्या कमी आहे. अशी विदारक चित्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये दिसून येत आहे. पंधरा जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५६ तर उनपच्या ३ शाळा आहेत. मात्र यापैकी अनेक शाळांमध्ये कमी पटसंख्या कमी आहे.
अमराठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ
याच शाळांतून नोकरी व्यवसाय आणि मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या पर राज्यातील अमराठी पाल्यांची मूल-मुली शिक्षण घेत आहेत. परिणामी मराठी शालांतून अमराठी भाषिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक गावांत आपल्या मुलांना गावातच प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी गावातील नागरिकांनी आपल्या जागा जमिनी मोफत दिल्या आहेत. तर या शाळांच्या इमारती अंग मेहनतीने व लोक वर्गणीतून उभ्या करण्यात आल्या होत्या. या शाळा सध्या ओस पडू लागल्या आहेत.
सोयीसुविधांची वानवा
अनेक मराठी शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, क्रीडांगण, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. उरणमधील अनेक शाळा जुन्या आणि कौलारू आहेत. सध्या पावसामुळे शाळांच्या छप्परगळतीची मोजणी अशक्य आहे. मात्र काही शाळांमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे नाहीत. स्वतंत्र असलेल्या प्रसाधनगृहांमध्ये पाण्याची व्यवस्था पुरेशी नाही. ग्रामीण भागातील शाळांमध्ये आवश्यक सीसीटीव्हीसाठी शासनाकडून फारसी तीही वेळेवर मदत मिळत नाही. काही शाळांमध्ये मैदाने असली तरी खेळ खेळण्याइतपत मोठी नसल्याने गैरसोयीचे ठरत आहेत.
ग्रामीण भागातील शाळांच्या पाहणीत मोठी जुई, आवरे, मुळेखंड, चाणजे, कोंढरीपाडा येथील शाळा नादुरुस्त असल्याचे आढळून आलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.- सागर पवार, गट शिक्षणाधिकारी, उरण पंचायत समिती
