उरण : रविवारी उरणच्या रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचले आहे. समुद्राच्या भरतीमुळे या स्थानकात पाणी येत असून त्यावर उपाययोजना करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातून मार्गक्रम करावा लागत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी उरण आणि द्रोणागिरी या दोन्ही स्थानकांच्या तिकीट घर आणि ये जा करण्याच्या मार्गात पाण्याचे तळे साचत  आहे. त्यामुळे अनेक समस्यांच्या बरोबरीने याचाही सामना आता प्रवाशांना करावा लागत आहे. उरण ते नेरुळ आणि बेलापूर हा लोकल मार्ग सुरू होऊन अवघे काही महिने झाले आहेत. यात

भुयारी मार्ग असलेल्या उरण  आणि द्रोणागिरी या  स्थानकातील मार्गात यावर्षी ही पावसाळ्यात पाणी साचण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांवर पाण्यातून  मार्गक्रमण करीत प्रवास करण्याची वेळ येणार आहे. मात्र ही समस्या कायमस्वरूपी असल्याने स्थानकात पाणी उपसा यंत्र बसविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र हे यंत्र ही अनेकदा बंद असतात.

उरण ते नेरुळ/ बेलापूर या लोकल मार्गावरील उरण आणि द्रोणागिरी स्थानकात ये जा करण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करावा लागत आहे.  मात्र पाऊस आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे  भुयारी मार्गात दीड ते दोन फूट पाणी साचते.  लोकल सुरू झाल्याने उरण नवी मुंबई आणि मुंबईला लोकलने जोडला गेला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, चाकरमानी आणि सामान्य प्रवाशांना याचा फायदा झाला आहे. मात्र या सेवेनतेरही  येथील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. उरण ते खारकोपर दरम्यानच्या उरण स्थानकावर ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. ही स्थानके उभारण्यात आल्यानंतर उदघाटना पूर्वी पहिल्याच पावसात या स्थानकात पाच फूट पाणी साचल्याने येथील तरुणांनी या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला होता. त्यानंतर याची दखल घेत रेल्वेने स्थानकात कायमस्वरूपी पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत.

असे असतांना सध्या याच स्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या स्थानका बाहेरील परिसरात ही मोठया प्रमाणात पाणी साचत असल्याने प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. या संदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद नव्हता. उरण व द्रोणागिरी ही दोन्ही स्थानक समुद्र सपाटी पासून खाली आहेत. या भागात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरते. २०२४ ला या स्थानकांच्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले त्याचवेळी या मार्गात पाणी शिरले होते. रेल्वे विभागाने या भुयारी मार्गाचे काम करतांना येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला होता का अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी या घटनेनंतर प्रवाशांकडून केली जात आहे.

उरण रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात वारंवार पाणी साचत आहे. त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अस्वच्छ डबे आणि वीज नसल्याने अंधारही पसरत आहे. अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी दिली आहे.