उरण : उरण तालुक्यातील नागरिक आणि औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणारे रानसई धरण अखेर रविवारी रात्री उशिराने भरलं. अवघ्या पाच दिवसाच्या जोरदार पावसाने हे धरण भरलं आहे. हा आज पर्यंतचा रेकॉर्ड आहे. जून महिना कोरडा गेल्याने उरणकारांची पाणी चिंता वाढली होती. त्यामुळे नियमितपणे पाणी कपात असलेल्या मंगळवार आणि शुक्रवार खेरीज एमआयडीसी ने जादाची रविवारचीही पाणी कपात लागू केली होती. रानसई धरण याची ११६ फूट उंची असलेल्या धरणात ८६ फूट ही मृतसाठ्याची पातळी आहे.
ही पातळी खालावून ती ८१ फुटांवर पोहचली होती. त्यामुळे पाणी चिंता आणखी वाढली होती. मात्र जुलै मध्ये मोसमी पावसाने जोडरदार आगमन केल्याने एमआयडीसीने रविवारची पाणी कपात रद्द केली होती. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला असून पुढील काळात उरणकारांची दोन दिवसांची पाणी कपात ही रद्द होणार आहे. रानसई धरणाची पातळी खालावल्याने येथील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे.
ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराना दररोज ४१ दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसी कडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज १० दश लक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणी पुरवठा जून महिन्या पर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी पाणी कपात केली जात आहे.
१९६० च्या दरम्यान उरण मध्ये संरक्षण विभागाच्या शस्त्रागारा साठी उरणच्या पूर्व विभागातील दिघोडे परिसरात रानसई धरणाची उभारणी करण्यात आली. याच धरणातून येथील ग्रामपंचायतींनाही पाणी पुरवठा करण्यात येऊ लागला. मात्र हे धरण प्रामुख्याने औद्योगिक विभागाला लागणारं पाणी पुरविण्यासाठी तयार करण्यात आले. त्यानुसार शास्त्रागारा नंतर,आलेल्या ओ एन जी सी चा तेल शुद्धधिकरण प्रकल्प,वीज निर्मितीचा वायू विधुत केंद्र तसेच भारत पेट्रोलियम चा घरगुती सिलेंडर भरणा प्रकल्प या औधोगीक प्रकल्पा साठी त्याच प्रमाणे उरण शहर व नगरपालिका यांनाही पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी रानसई धरणावरच येऊन पडली.
पाण्याची मागणी वाढली,तर साठवणूक क्षमता घटली
मात्र गेल्या ६० वर्षात धरणातील पाण्याची मागणी वाढली असली तरी रानसई धरणातील पाणी साठा कमी कमी होत गेला.धरणाची स्थापित क्षमता १० दशलक्ष घनमीटर असली तरी ती घटून सध्या ७ दश लक्ष घनमीटर पेक्षा कमी झाली आहे.
रानसई धरणाची क्षमता वाढविण्याची मागणी
रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढवावी किंवा धरणातील गाळ काढावा या दोन उपाययोजनाची चर्चा गेल्या पंचवीस वर्षा पासुन केली जात आहे. यातील धरणाच्या गाळाची पाहणी पुण्यातील एका संस्थे कडून करण्यात आली असून गाळाचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र साठ वर्षात धरणग्रस्तांचे पुनर्वसन नाही.रानसई धरणाच्या उभारणीसाठी ज्या शेतकरी व आदिवासीच्या जनिमी संपादीत करण्यात आलेल्या आहेत.
त्यांचे पुनर्वसन आजही झालेले नाही. त्यामुळे नव्याने धरणाची उंची वाढविण्यासाठी लागणारी जमीन संपादीत करावी लागणार असली तरी त्यांच्याही पुनवर्सनाचा प्रश्न आहे.या संदर्भात मागील अनेक वर्षे आमसभेत हा प्रश्न विचारला जात असला तरी त्यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्याची दखल घेत पाठपुरावा केला नसल्याने पाणी टंचाई ची ही समस्या गंभीर होऊ लागली आहे.उरण तालुक्यात पाणी कपात रानसई धरणातील पाणी साठयातून पाणी पुरविण्यासाठी आठवड्यातील मंगळवार व शुक्रवारी कपात करण्यात येत आहे.
