महात्मा गांधींच्या हाकेनुसार स्वातंत्र्य संग्रामात कायदेभंगाच्या झालेल्या चळवळीत चिरनेर मधील जंगल सत्याग्रहातील गोळीबारात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना रविवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते,बबन पाटील, आमदार बाळाराम पाटील,माजी आमदार मनोहर भोईर,नगरसेवक प्रितम म्हात्रे,प्रशांत पाटील,उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे,भूषण पाटील यांच्या सह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही वाहतूककोंडी पिच्छा सोडेना !!!

२५ सप्टेंबर १९३० साली ब्रिटीश सरकारच्या जंगल कायद्याच्या विरोधात चिरनेरच्या अक्कादेवी माळरानावर जंगल सत्याग्रह झाला होता. यावेळी ब्रिटीशांनी केलेल्या गोळीबारात आठ हूतात्म्यांसह एकूण १३ जण मरणपावले होते. ही घटना संपूर्ण भारतात “चिरनेरचा जंगल सत्याग्रह” म्हणून गाजली होती. तेव्हा पासून चिरनेर येथे दरवर्षी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतीदिन शासकीय मानवंदना देत साजरा केला जातो. मागील दोन वर्षेकोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे चिरनेर जंगल सत्याग्रह प्रत्यक्षात ज्या ठिकाणी झाला त्याच पाड्यावरील हुतात्मा झालेल्या नाग्या महादु कातकरी याचा स्मृतिदिन वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चिरनेरच्या अक्कादेवी माळरानात साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातून आदिवासी कातकरी समाजाची मंडळी सहभागी झाले होते. यावेळी पारंपारीक नाच व सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वनवासी कल्याण आश्रमाचे उरण तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी केले होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई : रविवारी माथाडी कामगारांचा भव्य मेळावा , मेळाव्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

आदित्य ठाकरेंची प्रतिक्षाच
चिरनेर मधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे येणार होते. आयोजकांनी शेवट पर्यंत येणार की नाही ते स्पष्ट न केल्याने ते न आल्याने त्यांची प्रतिक्षा लागून राहिली होती.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran salute to the martyrs of chirner jungle satyagraha amy
First published on: 25-09-2022 at 16:02 IST