उरण : तालुक्यात शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास २०१० मध्ये मंजुरी मिळाली होती. या रुग्णालयाचे भूमिपूजन सप्टेंबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र १६ वर्षांनतरही या रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही. दरम्यान रुग्णालयाच्या बांधकामाची अंतिम मंजुरी येत्या दोन महिन्यांत मिळेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

उपजिल्हा रुग्णालय सुरू होणे उरणकरांसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्याचे काम सुरू न झाल्याने नागरिकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाच्या नवीन आराखड्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. भूमीपूजन केल्यानंतर निवडणुका आल्याने या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती मात्र त्यानंतरही रुग्णालयाचे प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.

रुग्णालयासाठी सिडकोने दिलेला भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असल्याने या रुग्णालयाचा आराखडा बदलण्यात आला. नवीन आराखड्यानुसार बोकडवीरा येथील भूखंडावर तळ मजल्यासह चार मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये १०० खाटांचे रुग्णालय असणार आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरणच्याबाजूला असलेल्या भूखंडावर कर्मचाऱ्यांसाठी तीन इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी ८४.५४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.रुग्णालयाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. – डी. एम. पाटील, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण